पाचगाव - पाचगाव परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून लोकांना फिरताना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे.गेल्या आठ दिवसात दोन लहान मुलांचा पाठलाग करून कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यांना सी पी आर मध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले.संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.
पाचगाव सह शहराला लागून असणाऱ्या उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षापासून लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला जात असतात त्यांना रस्त्यावरून जात असताना भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे. काहीवेळा ही कुत्री वाहनधारक व सायकल स्वरांचा पाठलाग करून अनेकांना चावलेल्या घटनाही घडलेल्या आहेत.
या परिसरात ठिकाणी अनेक चौकांमध्ये खाद्यपदार्थांच्या हातगाड्या चिकन मटणाची दुकाने असल्याने येथे खवय्यांची नेहमीच गर्दी असते .खाद्यपदार्थांच्या हातगाड्या वरील खरकटे व चिकन मटणाच्या दुकानातील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट न लावता याच परिसरात टाकण्यात येते त्यामुळे भटकी कुत्री या ठिकाणी जास्त प्रमाणात येत असतात.
प्रशासनाचे दुर्लक्ष
परिसरातील स्वच्छता कचरा वेळेत उठाव न करणे त्यामुळे अन्नपदार्थ शोधण्यासाठी कुत्रे येतात तसेच भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण होत नसल्याने दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढू लागली आहे संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
प्रियांका संग्राम पाटील, सरपंच, पाचगाव
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे ही गरज असून महापालिकेकडे पाठपुरावा करून लवकरच भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील राहू.
विकी काटकर,शिवसेना करवीर , उपतालुकाप्रमुख
पाचगाव परिसरामध्ये कुत्र्यांनी नागरिकांना अक्षरशः सळो कि पळो करून सोडले आहे.दोन दिवसापूर्वी एका भटक्या कुत्र्याने लहान मुलीचा चावा घेतल्याने तिला सी पी आर मध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले.पाचगाव ग्रामपंचायत ला वारंवार नागरिकांनी तक्रार देऊन सुद्धा पाचगाव ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केले आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा.