प्रदीप शिंदे
कोल्हापूर : वाहनांच्या गर्दीत असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापुरातील विभागीय कार्यालयात आता नंदनवन फुलणार आहे. कार्यालयात ‘दत्तक कुंडी योजना’ राबविली जात असल्याने, लवकरच हे कार्यालय ‘ग्रीन कार्यालय’ म्हणून ओळखले जाणार आहे.वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही, ही काळाची गरज ओळखून मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी एस.टी.च्या कोल्हापुरातील विभागीय कार्यालयाने कंबर कसली आहे. कार्यालयीन परिसर ग्रीन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमास कर्मचारी व अधिकारी यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भविष्यातील दुष्काळी संकटांचा मुकाबला करण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी झाडे लावणे ही काळाची गरज आहे. नेमकी हीच गरज ओळखून कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी हा उपक्रम येथे राबविला जाणार आहे.
येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उपक्रमाबाबत सर्व कर्मचारी व अधिकारी यांची बैठक घेऊन हा उपक्रम राबविला आहे. त्याप्रमाणे विभागीय कार्यालयाच्या आवारात व प्रत्येक विभागाबाहेर कुंडी ठेवण्यात येणार आहे. या कार्यालयाबाहेर मोकळ्या जागेत बगीचा करण्याचे काम सुरू आहे.
तेथील कुंड्यांमध्ये कोणत्या प्रकारची फुले व पाने असलेली झाडे लावण्यात यावीत, यासाठी अभ्यासपूर्ण माहिती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये विभागातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये एक कुंडी दत्तक देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे फाइलींच्या गर्दीत हरविलेले कार्यालय आता विविध पाना-फुलांच्या गर्दीत दिसणार आहे.
प्रत्येक कुंडीची नोंदकार्यालयातील प्रत्येकी कुंडीची नोंद ठेवली जाणार आहे. तिच्यात केवळ झाडे लावून काम संपणार नाही; तर ते झाड त्या कर्मचाऱ्यांना दत्तक देऊन त्याच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. तसेच वर्षभरात त्या झाडाची निगा कशी राखण्यात येते, हे पाहण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धन हे फक्त एकट्याचे काम नसून त्यासाठी सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे. पाना-फुलांकडे पाहिल्यामुळे मन प्रसन्न होते. कामात आलेली मरगळ दूर होते. प्रत्येकाच्या मनात आपुलकी निर्माण होण्यासाठी दत्तक कुंडी योजना राबविली जाणार आहे.- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, कोल्हापूर