कोल्हापूर : बारावीच्या गुणपत्रकांचे शहरासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये मंगळवारी दुपारी तीननंतर वितरण करण्यात आले. त्यानंतर गुणवंतांच्या अभिनंदनाचे फलक महाविद्यालयांतून झळकले. गुणपत्रिका घेण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी गर्दी केली. पदवी प्रथम वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून गती मिळणार आहे.
कोल्हापुरात मंगळवारी बारावीच्या गुणपत्रिकांचे विविध महाविद्यालयांमध्ये वितरण करण्यात आले. न्यू कॉलेजमध्ये गुणपत्रिका घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयातर्फे मंगळवारी सकाळी अकरा वाजता वितरण केंद्रांवरून जिल्ह्यातील महाविद्यालयांना गुणपत्रिका देण्यात आल्या.
महाविद्यालयांमध्ये दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्यासाठी महाविद्यालयांनी प्रवेश कक्ष, ग्रंथालय आदी ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केली होती. गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये गटागटांनी प्रवेशाबाबतच्या गप्पा रंगल्या होत्या.
विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत, काही पालकांसमवेत गुणपत्रिका नेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये आले होते. महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती घेणे. अर्ज घेणे आदी स्वरूपातील विद्यार्थ्यांची गडबड सुरू होती...