कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून बी. ए. भाग एकच्या सत्र दोनमधील हिंदी विषयाची चुकीची प्रश्नपत्रिका गुरुवारी विद्यार्थ्यांच्या हातात पडली. त्यांनी संबंधित चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना दीड तासाने योग्य प्रश्नपत्रिका मिळाली.हिंदीचा पेपर दुपारी बारा वाजता सुरू झाला. ‘आधुनिक हिंदी साहित्य (ऐच्छिक) सुनी घाटी का सूरज व व्याकरण’ या प्रश्नपत्रिकेऐवजी त्यांच्या हातात ‘आधुनिक हिंदी साहित्य (ऐच्छिक) पाठ्यपुस्तक साहित्य विविध’ या विषयाची प्रश्नपत्रिका पडली. चुकीची प्रश्नपत्रिका मिळाल्याचे काही विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुखांच्या निदर्शनास आणून दिले.
याबाबतची माहिती केंद्रप्रमुखांनी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाला दूरध्वनीवरून कळविली. यानंतर पुन्हा सुधारित प्रश्नपत्रिका या मंडळाकडून सिक्युअर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी (एसआरपीडी) या प्रणालीद्वारे पाठविण्यात आली.
त्यामुळे पेपर नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिरा सुरू झाला. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाकडून झालेल्या या चुकीचा फटका कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना बसला. दरम्यान, यांतील काही विद्यार्थ्यांचे दुपारच्या सत्रात अन्य विषयांचे पेपर होते. त्यांचाही गोंधळ उडाला.