कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत चालविल्या जात असलेल्या राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राकडील नऊ विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या विविध विभागांतील भरतीपूर्व परीक्षेत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांची विविध पदांवर भरती निश्चित झाली आहे. याबद्दल सर्व नऊ यशस्वी विद्यार्थ्यांचा नुकताच महानगरपालिकेच्या सभेत महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यापूर्वी याच अभ्यासकेंद्रातून ३२ विद्यार्थी सध्या शासनाच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या विविध विभागांतील भरतीमध्ये या अभ्यासकेंद्रातील मुलांनी यश संपादन केले. ऋतुजा दिलीप पाटील हिची असिस्टंट मोटर व्हेईकल, नीलम सर्जेराव पाटील व गायत्री उदय शिपेकर यांची मंत्रालय लिपिकपदी, माधुरी संदीप कुंभार, बाजीराव पाटील, दिगंबर भागोजी पाटील व अमित पाटील यांची परिवहन विभाग लिपिकपदी, उमेश कुंभार यांची महाराष्ट्र पोलीस, तानाजी शामराव कोईगड याची मंत्रालय लिपिक पदावर निवड झाली आहे.स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या गरजू, होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांची सोय व्हावी, यासाठी राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्र सुरू केले असून, या अभ्यासकेंद्राचा कोल्हापुरातील ६५० पेक्षा अधिक विद्यार्थी लाभ घेतात.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महानगरपालिकेचे प्रभारी उपायुक्त मंगेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महापौर स्वाती यवलुजे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचे हस्ते महासभेमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.