कोल्हापूर : वसतिगृहात खिडकीकडेला झोपण्याच्या कारणावरून रजपूतवाडी (ता. करवीर) येथील प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतिराव फुले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वसतिगृहात दोघा विद्यार्थ्यांमध्ये वाद होऊन मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
शंकर सावळाराम झोरे (वय १७, रा.अंबाई वाडा उखळू, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. १०) रात्री घडली. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची फिर्याद वसतिृगृह अधीक्षक दत्तात्रय म्हादू जाधव (वय ५३ मूळ रा. वाखारी, ता. देवळा, जि. नाशिक, सध्या रा. सोनतळी, ता. करवीर) यांनी दिली.याबाबत महाविद्यालय प्रशासनाने दिलेली माहिती अशी की,‘रजपूतवाडीत भटक्या व विमुक्त समाज शिक्षण मंडळ संचलित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा आणि महात्मा जोतिराव फुले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चालविले जाते.महाविद्यालयाच्या आवारातच मुलांचे वसतिगृह आहे. पहिल्या मजल्यावर पहिली ते सातवी आणि दुसऱ्या मजल्यावर आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांची सोय आहे. या मजल्यावरील खोलीत संशयित आरोपी शंकरला खिडकी कडेला झोप असे म्हणत होता परंतू त्यास तो तयार नव्हता. त्यावरून बुधवारी रात्री अकरावी आर्टसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर शंकरचा वाद झाला.
वसतिगृहातील याच खोलीमध्ये मृत शंकर झोरे व संशयिताचा वाद झाला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)
यामध्ये त्या विद्यार्थ्याने शंकरच्या छातीवर, पोटावर ठोसे मारले. त्यामध्ये शंकर अस्वस्थ झाला. इतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार वसतिगृह अधीक्षक दत्तात्रय जाधव यांना सांगितला. जाधव यांनी तत्काळ त्याला दुचाकीवरून वडणगे (ता.करवीर) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्याला डॉक्टरनी सीपीआरमध्ये नेण्यास सांगितले.
सीपीआरमध्ये आणल्यावर शंकर झोरेला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. जाधव यांनी घडला प्रकार झोरे यांच्या कुटुंबीयांना व करवीर पोलिसांना कळविला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
शवविच्छेदनानंतर शंकरचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतला. गुरुवारी सकाळी अंबाईवाडा या मूळ गावी शंकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गरिब शेतकऱ्याचा मुलगा..शंकर हा दहावीपासून आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील शेतीचे काम करतात. संशयित आरोपीने याचवर्षी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. सध्या त्याचे आई-वडील खांडवा (मध्यप्रदेश) येथे राहत असून त्याठिकाणीच काम करतात.
वसतिगृहातील विद्यार्थी संख्या...* पहिली ते सातवी विद्यार्थी : १२० पैकी ९१ उपस्थित* आठवी ते १२ वी : १०९ पैकी ८८
घटनेनंतर तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव व मी स्वत: घटनास्थळी भेट दिली. शंकर झोरे याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.-दिलीप जाधव,पोलीस निरीक्षक, करवीर पोलीस ठाणे.
वसतिगृहात रोज सकाळी नाष्टा, जेवण दिले जाते तर सायंकाळी सातनंतर जेवण दिले जाते. बुधवारी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांचे जेवण झाले. त्यानंतर रात्री हा प्रकार घडला.- दत्तात्रय जाधव,अधीक्षक वसतिगृह, रजपूतवाडी.