युक्रेनहून परतलेल्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया
By संतोष.मिठारी | Published: September 8, 2022 04:29 PM2022-09-08T16:29:00+5:302022-09-08T16:30:38+5:30
इतर देशात प्रवेश हस्तांतरित करण्यास नॅशनल मेडिकल कौन्सिलने मान्यता देण्याची मागणी या विद्यार्थ्यांतून होत आहे.
कोल्हापूर : रशिया-युक्रेन युद्धामुळे कोल्हापुरात परतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तीन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. त्यांनी जॉर्जिया, रशिया, किरगिझस्तान, आदी परदेशातील नव्या विद्यापीठांत प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. इतर देशात प्रवेश हस्तांतरित करण्यास नॅशनल मेडिकल कौन्सिलने मान्यता देण्याची मागणी या विद्यार्थ्यांतून होत आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाची आपल्या देशात असणारी तीव्र स्पर्धा आणि खर्चाचा आकडा लक्षात घेऊन अनेक विद्यार्थी रशिया, युक्रेन, जॉर्जिया, रोमानिया, आदी देशांतील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. त्यानुसार गेल्या वर्षी कोल्हापुरातील चार विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण नियमितपणे सुरू होते. त्यातच फेब्रुवारीमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले. तेथून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने ते कोल्हापुरात परत आले. त्यानंतर दीड महिन्याने दोन विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले. उर्वरित दोघांच्या विद्यापीठाकडून फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही.
युक्रेनमधील माझ्या विद्यापीठाने पहिले सत्र पूर्ण केले आहे. दि. १ सप्टेंबरपासून ऑनलाइन वर्ग सुरू झाले. एकूण सहा वर्षांचा अभ्यासक्रम आहे. युक्रेनमध्ये युद्धाची स्थिती पुन्हा निर्माण झाल्यास शिक्षणात खंड पडू शकतो. पुन्हा त्रास नको. शिक्षणात सातत्य राहावे यासाठी किरगिझस्तान, कझाकिस्तान, आदी देशांत प्रवेशित होण्याचा विचार करत आहे. कुटुंबीयांच्या निर्णयानंतर त्याबाबतचे पुढील पाऊल टाकणार आहे. -ऋतुजा कांबळे, फुलेवाडी
नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार कोणत्याही एकाच विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे. त्यामुळे युक्रेनमधील विद्यापीठातील प्रवेश हस्तांतरित करण्यात अडचण येत आहे. लिव्हिंग सर्टिफिकेटही मिळालेले नाही. एकप्रकारे आमचे वर्ष वाया गेले आहे. आता रशियातील विद्यापीठात नव्याने प्रवेश घेण्याची चौकशी करत आहे. आपल्या केंद्र सरकारने आमचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी काही जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. -शाकंभरी लोंढे-पाटील, न्यू पॅलेस
युक्रेनमधील ज्या विद्यापीठात मी शिक्षण घेत होतो. ते बेचिराख झाले आहे. त्यामुळे पुढील शिक्षणाबाबत काहीच झाले नाही. युद्धाचा फटका बसून आमचे शैक्षणिक नुकसान झाले. रशियातील एका विद्यापीठात प्रथम वर्षाला प्रवेश घेणार आहे. आमचे पहिले वर्ष होते. मात्र, युक्रेनमध्ये जे अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या, चौथ्या वर्षात आहेत. त्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यांना आपल्या देशात प्रवेश देण्याबाबत सरकारने विचार करावा. -प्रवंश कांबळे, गारगोटी