कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विनापरवाना होर्डिंग, अनधिकृत फलक काढण्याची मोहीम बुधवारीही सुरूच ठेवली. या मोहिमेत गांधी मैदान विभागीय कार्यालयअंतर्गत अनधिकृत व विनापरवाना होर्डिंग, बॅनर्स व जाहिरात फलक, आदी २५१ फलक काढण्यात आले. कारवाईनंतरही कोणी विनापरवाना फलक लावल्यास तसेच अतिक्रमण केल्यास संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरातील विनापरवाना फलक, होर्डिंग काढण्याची मोहीम राबविली जात आहे. बुधवारी शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक, खरी कॉर्नर ते पाण्याचा खजिना, इंदिरासागर हॉटेल, हॉकी स्टेडियम ते कळंबा साईमंदिर या परिसरातील अनधिकृत व विनापरवाना होर्डिंग, बॅनर्स व जाहिरात फलक काढण्यात आले. या फलक निर्मूलन कारवाईत २१ डिजिटल बोर्ड, बॅनर्स व जाहिरात फलक २३० असे एकूण २५१ डिजिटल फलक काढण्यात आले.
सदरची कार्यवाही उपशहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता आर. के. जाधव, सर्व्हेअर सचिन देवाडकर, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख पंडित पोवार, मुकादम जनार्दन डफळे, सूर्यकांत यादव; त्याचप्रमाणे सर्व विभागीय कार्यालयांतील मेस्त्री, मुकादम यांनी केली. यावेळी कारवाईत दोन डंपर, एक जेसीबी, एक बूम या यंत्रणेसह अतिक्रमण, विद्युत व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ६० कर्मचाºयांनी भाग घेतला. विनापरवाना होर्डिंग हटविण्याची कारवाई सुरूच राहणार असून, संबंधितांनी अनधिकृत जाहिराती फलक, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स त्वरित काढून घ्यावीत; अन्यथा संबंधितांवर महानगरपालिका मालमत्ता विद्रूपीकरण अधिनियमानुसार फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणदोन दिवसांपूर्वी ताराबाई रोड, महाद्वार रोड येथील अतिक्रमण तसेच रस्त्यावर मांडलेले जाहिरात फलक अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले होते; पण कारवाई करून पुढे गेल्यानंतर विक्रेते, फेरीवाले, व्यापारी यांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराकडे आयुक्तांचे लक्ष वेधले असता त्यांनी जर पुन्हा कोणी अतिक्रमण केले तर गुन्हे दाखल केले जातील, असे सांगितले.
संभाजीनगरात किरकोळ वादावादीसंभाजीनगर परिसरातील एक फलक गॅस कटरच्या साहाय्याने तोडला जात असताना संबंधित दुकानमालक आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी यांच्यात किरकोळ वादावादी झाली; परंतु वाद घालणाºया या दुकानदारास बाजूला करून त्यांचा फलक काढून टाकण्यात आला आहे.