कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत,नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका क्षेत्रात त्या-त्या लोकसंख्येनुसार रिक्त ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलैपर्यंत अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी केले.राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई-सेवा केंद्रे, सेतू सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे ब्रँडिंग करण्यात येत आहे. आपले सरकार सेवा केंद्र यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळावर सोपविण्यात आलेली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक केंद्र स्थापन करण्यात येईल; मात्र ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) असलेल्या ग्रामपंचायतीत किमान २ केंद्रे स्थापन केली जातील. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद १०००० लोकसंख्येसाठी एक केंद्र व प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल.
५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतीत किमान २ केंद्रे स्थापन करण्यात येईल. सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.