कोल्हापूर : पावसाळ्यात काविळ, गॅस्टोसारख्या आजारांचा प्रादुर्भाव पंचगंगा काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेने पंचगंगा नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे बंद करावे, असे सांगून खासदार राजू शेट्टी यांनी महानगरपालिका आयुक्त चौधरी यांच्यासोबत या प्रकल्पांना अचानक भेट देणार असल्याचे सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा हरिष जगताप, आदी प्रमुख उपस्थित होते.केंद्र सरकारपुरस्कृत विविध योजनांतर्गत झालेल्या उद्दिष्टपूर्तीचा आढावा घेत तळागाळातील तसेच ग्रामीण भागातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. या योजनांचा लाभ संबंधीत घटकांना मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने आणि काटेकोर प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले.खा. महाडिक यांनी कुत्रे चावून रेबिज होण्याच्या घटना वाढत आहेत. भटक्या कुत्र्यांना आवर घालण्याबाबत कोल्हापूर महानगरपालिका कोणत्या उपाययोजना करत आहेत याबाबत विचारणा केली तसेच ‘सीपीआर’कडे रेबीज प्रतिबंधक लसींचा किती साठा उपलब्ध आहे याची माहिती घेतली.
यावर जिल्ह्यात ३ हजार ७४२ रेबीज प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध पदाधिकारी, शासकीय सदस्य, अशासकीय सदस्य, विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत विविध योजनांचा आढावाया बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत मिशन, एकात्मिक बालविकास सेवा योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पायाभूत सुविधा कार्यक्रम, महानगरपालिका व नगरपालिकांकडील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
...तर बँकांची तक्रार रिझर्व्ह बँकेकडे करूस्टेट बँक आॅफ इंडिया व देना बँक या राष्ट्रीयकृत बँका लाभार्थ्यांचे खाते झिरो बॅलेन्सवर उघडण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी काही सदस्यांनी केल्या. त्यावर संबंधित बॅँकांनी असा प्रकार केल्यास त्यांची तक्रार रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे करण्यात येईल, असा इशारा खासदार शेट्टी यांनी यावेळी दिला.