कोल्हापूर : येथील ब्राह्मण सभा करवीरच्या वतीने शनिवार (दि. १२) ते (दि. १५) या कालावधीत पं. सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचे अध्यक्ष डॉ. उदय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महोत्सवाचे हे १२ वे वर्ष आहे.पद्मा तळवलकर यांच्या शास्त्रीय गायनाने या महोत्सवाची शनिवार (दि. १२) सुरुवात होणार आहे. रविवारी (दि. १३) पं. सत्यशील देशपांडे यांचे, तर सोमवारी (दि. १४) पं. विनोद डिग्रजकर आणि भारती वैशंपायन यांचे गायन होणार आहे.महोत्सवाचा समारोप मंगळवारी (दि. १५) जीवनगाणे प्रस्तुत ‘क्लासिकल हिटस् आॅफ शंकर जयकिशन’ या कार्यक्रमाने होणार आहे. प्रा. सचिन जगताप आणि केदार गुळवणी यांची ही निर्मिती आहे. रोज सायंकाळी ६ वाजता राम गणेश गडकरी हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. प्रवेश सर्वांना विनामूल्य असून, या महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला पं. विनोद डिग्रजकर, ब्राह्मण सभेचे कार्यवाह श्रीकांत लिमये, खजानिस संतोष कोडोलीकर, संचालक नंदकुमार मराठे, अशोक कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, अनुराधा गोसावी, गंधार डिग्रजकर उपस्थित होते.