कोल्हापूर : गेले दोन-तीन महिने घसरण सुरू असलेल्या साखरेचे दर काहीसे सुधारण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या स्थिर भावाच्या पार्श्वभूमीवर बाजारावर परिणाम दिसत असून, किरकोळ बाजारात सध्या प्रतिकिलो ३३ रुपये दर राहिला आहे. आवक मंदावल्याने भाजीपालाही चांगलाच वधारला असला तरी कडधान्यांचे दर मात्र स्थिर आहे. फळबाजारामध्ये फारसा चढउतार दिसत नसला तरी हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने आवक मंदावली आहे.यंदा साखरेच्या मागणीपेक्षा उत्पादन अधिक झाल्याने दरात घसरण सुरू राहिली. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल २७०० रुपयांपर्यंत साखर खाली आली; पण केंद्र सरकारच्या पातळीवर साखरेचे दर निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर लगेच त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे.
गेले आठ दिवसांपासून साखरेचा दर थोडासा वधारण्यास सुरुवात झाली आहे. सरकी तेलाचे दर किरकोळ बाजारात ८५ रुपये किलोवर स्थिर आहेत. हरभराडाळ, तूरडाळीसह इतर डाळींच्या दरांत फारसा फरक पडलेला नाही. ज्वारी २० रुपयांपासून २८ रुपये किलोपर्यंत आहे. मिरचीचा हंगाम संपल्याने बाजारातील ‘ठसका’ काहीसा कमी झाला आहे.स्थानिक भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. कोबी, वांगी, ढबू, गवार, कारली, भेंडीच्या दरात किलोमागे सरासरी पाच रुपयांची वाढ दिसते. गेले अनेक दिवस घाऊक बाजारात दोन ते सात रुपये किलोपर्यंत असणारा टोमॅटो या आठवड्यात तेरा रुपयांपर्यंत गेला आहे.
कोथिंबिरीची आवक स्थिर असली तरी मागणी चांगली असल्याने दर स्थिर आहेत. मान्सूनपूर्व पावसाने पालेभाज्यांची आवक एकदमच कमी झाल्याने दर तेजीत राहिले आहेत. मेथीची पेंढी २० रुपये झाली आहे.फळबाजारात गेले दीड-दोन महिने दरवळणारा हापूसचा वास काहीसा कमी झालेला दिसत आहे. आंब्याचा हंगाम संपत आला असला तरी फळबाजारात अननसांची आवक सुरू झाली आहे. रसरशीत अननस तीस रुपयांना मिळत आहे.‘पायरी’ ३० रुपये किलो!हापूस आंबा अजूनही शंभर रुपये डझनाच्या खाली नसला तरी किरकोळ बाजारात ‘पायरी’ आंबा सरासरी ३० रुपये किलो मिळत आहे. ग्राहकांच्या या आंब्यांवर उड्या पडत आहेत.
‘वटपौर्णिमा’ला आंब्याची टंचाई?वटपौर्णिमा साधारणत: जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात असते; त्यामुळे आंब्याचा हंगाम संपला तरी पौर्णिमेला आंबा उपलब्ध व्हायचा. यंदा अधिक महिन्यामुळे वटपौर्णिमा २७ जून रोजी येत असल्याने त्यावेळी आंब्याची टंचाई येईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.