कोल्हापूर : स्वाती यवलुजे यांच्या महापौरपदाचा कालावधी संपण्यासाठी दोनच दिवस राहिले असताना भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने कोणत्याही स्थितीत महापौर आपल्या आघाडीचा करायचाच, असा चंग बांधला आहे. त्या दृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला खिंडार पाडण्यासाठी कारभाऱ्यांनी पायांना भिंगरी बांधून नाराज नगरसेवकांच्या गाठीभेटींसाठी जोर धरला आहे.
कारभाऱ्यांच्या या हालचालींमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. कोणताही दगाफटका नको म्हणून आज, सोमवारी सभेनंतर त्वरित महापालिकेच्या दारातच आरामबस उभी करून सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना केले जाणार असल्याचे समजते.साम, दाम, दंड या त्रिसूत्रीचा वापर करीत कोल्हापूर महापालिकेत गेल्या अडीच वर्षांत न घडलेला चमत्कार घडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपल्या कारभारी मंडळींद्वारे वेगवान हालचाली केल्या आहेत.
सत्तारूढ गटाच्या तडजोडीनुसार यंदा हे पद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यानुसार आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनीही, महापौर निवडीत कोणताही दगाफटका नको म्हणून दक्ष राहून आपल्या हालचाली संयमी पद्धतीने सुरू ठेवल्या आहेत. महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने दोन्ही बाजूंनी ओबीसी महिलेला संधी देण्याची शक्यता फार कमी आहे.इच्छुकांची समजूत काढण्याचे प्रयत्नमहापौरपदासाठी दोन्हीही गटांकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. काँग्रेसकडून यापूर्वी कोणतीही पदे न भूषविलेल्या महिला सदस्यांनी महापौरपदाची उमेदवारी मागितली आहे. त्यामध्ये उमा बनसोडे, शोभा बोंद्रे, राहुल माने यांच्या आई इंदुमती माने, जयश्री चव्हाण, निलोफर आजरेकर यांचा समावेश असून, भाजप-ताराराणी आघाडीकडून उद्योगपती चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
तरीही स्मिता माने, रूपाराणी निकम, सविता भालकर, भाग्यश्री शेटके व तेजस्विनी इंगवले याही इच्छुक आहेत. उमेदवारांची संख्या वाढल्याने कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला वगळायचे याचा नेत्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.नाराजांची मनधरणीविद्यमान सभागृहात सदस्यांची नव्हे तर नेत्यांचीच आर्थिक कमाई झाल्याची चर्चा वाढू लागल्याने नाराज झालेले अगर आर्थिक अडचणीत असलेले सदस्य विरोधकांच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीत नाराज सदस्यांची संख्या अधिक असल्याने त्यांना भेटून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्याकडून केले जात आहेत.‘स’सुत्रींची पळापळभाजप-ताराराणी आघाडीचा महापौर करण्यासाठी ‘स’सुत्रींनी राष्ट्रवादी व काँग्रेसमधील नाराज नगरसेवकांवर फासे टाकले आहेत. त्यांच्या घरी जाऊन त्या नगरसेवकांना आर्थिकतेसह पदांची आमिषे दाखवून महापौर निवडणुकीतील आपले संख्याबळ वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.कोण पाडणार खिंडार...स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत एका नेत्यानेच खिंडार पाडल्याची चर्चा रंगली. त्यांना सहनेत्यांनी ‘क्लीन चिट’ दिल्याने ते पुन्हा बेभान होऊन सुटले आहेत. त्यामुळे या नेत्यांवरही आता जेथे जाईल तेथे नजर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.आजच्या सभेनंतरच खरे ‘लक्ष’उद्या, मंगळवारी महापौर स्वाती यवलुजे यांच्या पदाचा कार्यभार संपणार असल्याने त्यांनी आजच, सोमवारी शेवटची सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. महापौर निवडीतील फोडफोडीचे वातावरण पाहता कोणताही धोका घेण्यास नेते तयार नाहीत; त्यामुळे सभासमाप्तीनंतर महापालिकेच्या द्वारातच आरामबस उभी करून सदस्यांना अज्ञात स्थळी पाठविण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
तत्पूर्वी, भाजप-ताराराणीने राष्ट्रवादी-काँग्रेसच्या अनेक नाराज सदस्यांच्या गाठीभेटी घेतल्याचे असल्याचे समजते. त्याची फलनिष्पत्ती महापौर-उपहापौर निवडीच्या निकालात दिसेल.