कोल्हापूर : चोरी, मारामारीच्या गुन्ह्यात पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराने आपल्या शुक्रवार पेठेतील राहत्या घरी सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. नितीन नंदकुमार ओतारी (वय ३२) असे त्याचे नाव आहे.दरम्यान पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती; मात्र चौकशीनंतर त्याने स्वत:हून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असून मृत नितीनच्या वडिलांनीही काही तक्रार नसल्याचा जबाब दिल्याचे शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पत्रकारांना सांगितले.अधिक माहिती अशी, नितीन ओतारी याच्यावर चोरी, मारामारी, दहशत माजवण्याचे १३ गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो रिक्षा चालवत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या रिक्षाची आणि एका ट्रॅक्टरचा किरकोळ अपघात झाला होता. त्याची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांनी त्याला चौकशीला बोलवले होते.
मंगळवारी सकाळी तो घरातून बाहेर गेला. नऊच्या सुमारास तो घरी आला. त्यानंतर त्याने घरातील बेडरूममध्ये फॅनला साडीने गळफास घेतला. काही वेळाने हा प्रकार त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी त्याला खासगी वाहनातून सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.पोलिसांकडून होत असलेल्या मारहाणीला कंटाळून नितीनने आत्महत्या केल्याचा आरोप करीत त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज दाखवले, त्याचबरोबर शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनीही सीपीआरमध्ये जाऊन मृत नितीनच्या नातेवाईकांशी चर्चा केली.
नितीनला पोलिसांकडून मारहाण झाली नसल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह ताब्यात घेतला. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. आई, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.