मलकापूर/कोल्हापूर : सौते (ता. शाहूवाडी) येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केशव ज्ञानदेव वारंग (वय ५५) यांनी बाराबोअर बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. सोमवारी (ता.३१) रात्री साडे आठच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. शाहूवाडी पोलिसांत सोमवारी रात्री उशिरा घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव ज्ञानदेव वारंग यांचे सौते (ता. शाहूवाडी) येथे राहते घर व किरकोळ किराणा विक्रीचे दुकान आहे. पत्नी, मुलगा भरत यांच्यासह ते येथे वास्तव्यास होते. तर त्यांच्या दोन मुलींचे विवाह झाले आहेत. केशव वारंग हे सोमवारी रात्री आठच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातील दुसऱ्या मजल्यावर गेले याचवेळी घरासमोरच्या चौकात गावातील तरुण मंडळी लाऊडस्पीकर लावून थर्टी फर्स्टचा जल्लोष साजरा करीत होते.
दरम्यान केशव वारंग यांनी बाराबोअर बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. परंतु घरासमोर चौकात सुरू असलेल्या जल्लोषामुळे कोणालाही या गोळीबाराचा आवाज ऐकू आला नाही. जेवणाच्या निमित्ताने रात्री नऊ वाजता भरत याने वडिलांना हाक मारली परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्याने भरत याने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता सदरची धक्कादायक घटना समोर आली.
यावेळी बंदुकीची गोळी छातीत झाडून घेऊन वडील केशव वारंग हे बेडवरच रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने मुलगा भरतसह त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली. परिसरातही घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. तर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे हेही सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी घटनास्थळावरील बंदूक ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. याचवेळी घरगुती करणातून केशव वारंग अनेक दिवसांपासून निराश होते, असा जबाब त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिला आहे.
मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळाल्यानंतर सौते येथे मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शाहूवाडी उपविभागाचे प्रभारी अधिकारी अनिल कदम यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रानमाळे हे अधिक तपास करीत आहेत.पायाच्या अंगठ्याने ओढला चाप..केशव वारंग यांना शिकारीचा मोठा छंद होता. त्यातून त्यांना बंदूक चालविण्याचे कसबही अवगत झाले होते. गोळी झाडून घेऊन आत्महत्या करताना बेडवर बसून त्यांनी या बंदुकीचा दस्ता पायात तर नळ्या हाताने स्वतःच्या छाताडावर धरून पायाच्या अंगठ्याने बंदुकीचा चाप ओढला असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.