कोल्हापूर : जोरदार वादळी वारा व अवकाळी पावसाने गुरुवारी महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात विजेचे खांब कोसळणे, रोहीत्रे बाधित होणे, झाडांच्या फांद्या पडून वीजेच्या तारा तुटणे अशा घटना घडून ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाले.
सर्वाधिक नुकसान हे इचलकरंजीत झाले. महावितरणने वीज पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करुन युध्दपातळीवर खांब, रोहीत्रे, तारा जोडणे आदी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. कोल्हापूरातून महावितरणची पाच पथके इचलकरंजीत शनिवारी दाखल झाली असून दुरुस्तीच्या कामात सहभागी झाली आहेत.अवकाळी पावसाने महावितरणचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात विजेचे उच्च दाबाचे ११७ व लघुदाबाचे ४०७ खांब पडले. यामध्ये खांब बदलण्याचे काम सुरू असून पर्यायी वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर ४२१ रोहित्रे बाधित झाली असून शुक्रवारी दिवसभरात यातील निम्म्याहून अधिक सुरू करण्यात आली.तसेच ३३ के.व्ही. लाईनच्या ३७ लाईन बाधित झाल्या. यातील ३३ लाईन शुक्रवारी पूर्ववत सुरू झाल्या, तर उर्वरित शिरदवाड,माणगाव, तांबाळे व कागल येथील लाईन दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर सुरू होते. तसेच शहरातील साकोली कॉनर येथीलही वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला.