कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी ‘एसआयटी’ने अटक केलेल्या संशयित वासुदेव भगवान सूर्यवंशी (वय २९, रा. करकी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव, सध्या रा. साखळी, ता. यावल, जि. जळगाव), भारत ऊर्फ भरत जयवंत कुरणे (३७, रा. धर्मवीर संभाजी गल्ली, महाद्वार रोड, बेळगाव) या दोघांना रविवारी पहाटे शहरातील तावडे हॉटेल परिसरात फिरविले.
संशयित सूर्यवंशी याने बेळगावहून दुचाकी आणून ती तावडे हॉटेलच्या परिसरात वीरेंद्र तावडेच्या ताब्यात दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे; तर कुरणे याने पिस्तुलांचे हस्तांतरण केले होते. त्यामुळे या दोघांना शहरातील काही घटनास्थळी प्रत्यक्ष नेऊन माहिती घेतली. या संपूर्ण तपासाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.पानसरे हत्येच्या तपासामध्ये साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पानसरे हत्येच्या पूर्वी मारेकऱ्यांची बैठक झाली होती. ती कोल्हापुरात की अन्य ठिकाणी झाली होती, यासंदर्भात शनिवारी (दि. १) रात्री संशयित सूर्यवंशी आणि कुरणे यांच्याकडे चौकशी केली.
सूर्यवंशी याने बेळगावहून कोल्हापुरात तावडे हॉटेल येथे वीरेंद्र तावडे याच्याकडे दुचाकी आणून दिली होती. ती कुठल्या ठिकाणी दिली. तावडेची भेट किती वेळ झाली. तेथून हे दोघे कोठे गेले. याचा तपास करण्यासाठी रविवारी पहाटे सूर्यवंशीला तावडे हॉटेल परिसरात फिरवून घटनास्थळाची माहिती घेतली. त्या जागेचा पंचनामाही एसआयटीने केला.
बेळगावमधून त्याने कोणाकडून दुचाकी घेतली याबाबत त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू आहे. संशयित कुरणे याने पिस्तूल हस्तांतर केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. कुरणेसह सूर्यवंशीला सागरमाळ परिसरात फिरविले जाणार आहे.
पानसरे हत्येपूर्वी रेकी केली होती. त्यामध्ये या दोघांचा समावेश असल्याचे तपासात पुढे आले आहे. काही साक्षीदारांकडून या दोघांची ओळख परेडही करण्यात येणार आहे. सूर्यवंशी आणि कुरणे यांच्या तपासामध्ये गुंतागुंती वाढत असून, दोघेही तपासासाठी सहकार्य करीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.