कोल्हापूर : वाई हत्याकांडातील संशयित नराधम संतोष गुलाबराव पोळ (रा. धोम, ता. वाई) याला कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल पुरविल्याप्रकरणी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी शुक्रवारी सुरक्षारक्षकास तडकाफडकी निलंबित केले.
राकेश शिवाजी पवार (वय ३०, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. पोळ आणि अमोल पवार यांना छुप्या मार्गाने मदत केल्याचा ठपका पवार याच्यावर ठेवला आहे. तो दीड वर्षापूर्वी सोलापूरहून कळंबा कारागृहात रुजू झाला होता. त्याचे वर्तन सुरुवातीपासून संशयास्पद होते.
या प्रकरणात आणखी पाच प्रशिक्षणार्थी सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. त्यांना लवकरच सेवेतून कमी केले जाणार आहे. राज्याचे अप्पर कारागृह महासंचालक राजवर्धन यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती उपमहानिरीक्षक साठे यांनी दिली.दोन दिवसांपूर्वी मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन बंदी संतोष पोळ याच्याकडे पिस्तूल असल्याचा व्हिडीओ व्हॉट्स अॅपवरून प्रसारित झाला. उपमहानिरीक्षक साठे यांनी पोळकडे केलेल्या चौकशीत पिस्तूल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे कारागृहात मोबाईल आला कोठून यासंबंधी कसून चौकशी केली असता, सोलापूरहून दीड वर्षापूर्वी बदली होऊन आलेला सुरक्षारक्षक राकेश पवार याचे नाव पुढे आले.