कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या उदिष्टापैकी किमान ६७ टक्के पुर्तता केलेली नाही, अशा कर्मचाऱ्यांची वेतनवाढीला स्थगिती दिली आहे. साडे सहाशे कर्मचाऱ्यांना नोटीसा लागू केल्या असून व्यवसायाबरोबर नफा वाढला तरच पगारवाढ अशी व्यावसायिक बॅँकांप्रमाणे जिल्हा बॅँकेने भूमिका घेतल्याने आता कर्मचाऱ्यांना कात टाकावी लागणार आहे.जिल्हा बॅँक संचित तोट्यातून बाहेर येऊन नफ्यात आली हे जरी खरे असले तरी व्यवसाय वाढीला अपेक्षित गती मिळत नाही. त्यासाठी संचालक मंडळाने सहा हजार कोटीच्या ठेवी, शंभर कोटी नफ्याचे उदिष्ट ठेवून गेले वर्षभर काम केले.
शाखानिहाय कर्मचाऱ्यांना व्यवसायवृध्दीचे टार्गेट दिले होते. पण मार्च २०१८ चा ताळेबंद निश्चित करताना जेमतेम ४ हजार कोटीच्या ठेवी आणि ५६ कोटीचा नफा झाल्याने संचालकांचे नियोजन कोलमडले. त्यामुळे संचालकांनी कोणी किती काम केले याचा लेखाजोखा मांडण्यास सुरूवात केली आहे.
यामध्ये दिलेले उदिष्ट अजिबात पुर्ण न केलेले शंभरहून अधिक कर्मचारी आहेत. जे काम करणार नाहीत, त्यांना सुविधा मिळणार नाहीत, अशी भूमिका संचालकांनी घेतली आहे. त्यामुळे सरासरी ६७ टक्केपेक्षा कमी उदिष्ट पुर्ण केले त्यांची वेतनवाढीला स्थगिती दिली आहे. साधारणता साडे चारशे पासून पंधराशे रूपयांपर्यंत वेतनवाढ दिली जाते. ती रोखल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान, व्यवसाय वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी वर्षभर प्रयत्न केले, पण सध्या साखर उद्योग अडचणीत असल्याने शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यातच खरीप हंगाम, लग्न सराईमुळे शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने ठेवी संकलनावर परिणाम झाल्याचे मत कर्मचाऱ्यांचे आहे.
लेखी घेऊन वेतनवाढ शक्यवेतनवाढ रोखण्याची कारवाई अनपेक्षितपणे बॅँक व्यवस्थापनाने केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची खळबळ उडाली आहे. आगामी काळात उदिष्टपुर्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर वेतनवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. तशा हालचाली बॅँक पातळीवर सुरू असल्याचे समजते.
पुढारीपण करणाऱ्यांचे काय?जिल्हा बॅँकेत अजूनही संचालकांच्या मागे-पुढे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे जीव ओतून काम कणाऱ्यांनीच करायचे आणि पुढारीपणा करणाऱ्यांनी निवांत रहायचे, याबाबत कर्मचाऱ्यांमध्येच असंतोष आहे. या कर्मचाऱ्यांना चाप लावला तरच उदिष्टपुर्ती होऊ शकते, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.