संदीप आडनाईककोल्हापूर : निर्भया ते कोपर्डी असा संदर्भ असलेल्या आणि कष्टकरी वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलीच्या वाट्याला आलेल्या भोगाची छोटीशी कहाणी सांगणाऱ्या स्वप्निल राजशेखर दिग्दर्शित सावट हा लघुपट प्रतिष्ठेच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या कान्स शॉर्टफिल्म कॉर्नरमध्ये दाखविण्यासाठी निवडण्यात आला आहे.कोल्हापूरातील मातीत तयार झालेला आणि कोल्हापूरचे तंत्रज्ञ तसेच कलाकारांचा समावेश असलेला सावट हा हा अवघ्या २४ मिनिटांचा लघुपट. या लघुपटाची संकल्पना, पटकथा आणि संवाद आणि दिग्दर्शनही अभिनेता स्वप्निल राजशेखर यांचे आहे.निर्मात्या कविता चुरी, अभिषेक शेट्ये कॅमेरामन, डिझाईन मयूर कुलकर्णी, संकलन सलोनी कुलकर्णी यांच्यासह कैलास वाघमारे, प्रमोद फडतरे, स्नेहल संकपाळ आणि देवयानी शिंदे या कलाकारांचा अभिनय असलेल्या या लघुपटाला आतापर्यंत देशभरात ४१ विविध राष्ट्रीय पुरस्कार लाभलेले आहेत.८ मे ते १९ मे २0१८ या कालावधीत कान्स येथे भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या कान्स शॉर्टफिल्म कॉर्नरमध्ये हा लघुपट दाखविण्यात येणार आहे. गतवर्षी कोल्हापूरच्याच उमेश बगाडे यांचा चौकट हा लघुपटही कान्सच्या शॉर्टफिल्म कॉर्नरमध्ये दाखविण्यात आला होता.गोल्डन फिल्मिंगोचे सहकार्यमुंबईतील फिल्मिंगो शॉर्टफिल्म महोत्सव हा प्रतिष्ठेचा महोत्सव आहे. या महात्सवात १६0 लघुपटातून सावटला पहिले गोल्डन फिल्मिंगो अॅवार्ड मिळाले. या महोत्सवातील पहिल्या पाच विजेत्या लघुपटांच्या प्रवेशिका कान्ससाठी पाठविण्यात येतात. यंदा पाठविलेल्या पाचही लघुपटांना कान्समध्ये निवडण्यात आले आहे. त्यात सावटचा समावेश आहे.
दर्जेदार आणि चांगल्या लघुपटांचा पायंडा पडत आहे. सावटची कान्ससाठी निवड होणे हा त्या विषयाला मिळालेला न्याय आहे. सावट सर्वदूर पोहोचतोय, त्याला पसंती मिळतेय यासारखा आनंद दुसरा नाही.स्वप्निल राजशेखर,अभिनेता, दिग्दर्शक, सावट