कोल्हापूर : स्वाइन फ्लू या आजाराने डोके वर काढले आहे. शुक्रवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन महिलांचा मृत्यू झाला.हिराबाई पांडुरंग मेढेकर (वय ५५, रा. मोरे-मानेनगर, कळंबा, ता. करवीर) व परवीन नाबील माद्रे (३५, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) अशी मृतांची नावे आहेत. आजअखेर कोल्हापूर जिल्ह्यात २७ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.मोरे-मानेनगर येथील हिराबाई मेढेकर यांना सोमवारी (दि. १), तर परवीन माद्रे यांना ३० सप्टेंबरला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या दोघींचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सध्या छत्रपती प्रमिलाराजे रुगणालयासह (सीपीआर) शहरातील १२ खासगी रुग्णालयांत स्वाइन फ्लूचे कक्ष आहेत. या आजाराच्या ३६ रुग्णांपैकी १८ संशयित रुग्ण आहेत. स्वाइन फ्लूच्या मृतांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यात २७ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यांतील मृतांचा समावेश आहे.