कोल्हापूर : कुत्रे हुसकावल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेच्या ठेकेदारावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी पाठलाग करून तलवार व हॉकी स्टिकने हल्ला केला. ही घटना मंगळवारी दुधाळीजवळील एका हायस्कूलच्या रस्त्यावर घडली. या हल्ल्यात आशिष शामराव मांडवकर (वय ४२, रा. संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार समजताच शिवाजी पेठेतील नागरिक, त्यांच्या मित्रांनी ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली होती. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.
याबाबत आशिष मांडवकर यांनी पोलिसांकडे जबाब दिला. यामध्ये संशयित आनंदा ऊर्फ पप्पू सुतार यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी हल्ला केला असल्याचे जबाबात मांडवकर यांनी म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी आशिष मांडवकर हे दुचाकीवरून कामानिमित्त रंकाळा रस्त्यावरून दुधाळीकडे निघाले होते.
याचवेळी संशयित पप्पू सुतार व त्याचे साथीदार हे मांडवकर यांच्याजवळ दुचाकीवरून आले व त्यांनी मांडवकर यांना अडविले. हल्लेखोरांना पाहताच ते पळू लागले. त्यांचा पाठलाग करीत संशयित हल्लेखोरांनी तलवार व हॉकी स्टिकने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर संशयित पसार झाले. या हल्ल्यात आशिष मांडवकर हे जखमी झाले. त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आले. त्यांच्या डोक्यास व पायास जखम झाली आहे. ‘सीपीआर’मध्ये पोलीस कॉन्स्टेबल सिंघन यांनी जखमी मांडवकर यांचा जबाब घेतला.
दोन दिवसांपूर्वी कुत्रे हुसकावल्याच्या कारणावरून आशिष मांडवकर व संशयित पप्पू सुतार यांचा वाद झाला. या वादातून माझ्यावर हल्ला झाल्याचा संशय मांडवकर यांनी जबाबात केला आहे. दरम्यान, हा हल्ला कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला, याची माहिती जुना राजवाडा व लक्ष्मीपुरी पोलीस घेत होते. त्यामुळे हा गुन्हा दोन्ही पोलीस ठाण्यांत मंगळवारी दुपारपर्यंत दाखल नव्हता.दोघेही संध्यामठ परिसरातीलजखमी मांडवकर व संशयित सुतार हे दोघे संध्यामठ परिसरात राहावयास आहेत. सोमवारी (दि. १) हा वाद दिवसभर धुमसत होता. या वादातून मांडवकर यांच्यावर हा हल्ला झाला असल्याची चर्चा यावेळी ‘सीपीआर’मध्ये सुरू होती.