कोल्हापूर : केबल टीव्हीबाबतच्या मॅक्सिमम रिटेल प्राईस (एमआरपी) बाबत दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नवे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केबलचे दर दुप्पटीने वाढणार आहेत. फ्री-एअर चॅनेल पाहण्यासाठी टी. व्ही. सुरू करायचा असेल, तर ग्राहकांना १५0 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना बसणार आहे. दर वाढल्यास ग्राहक कमी होऊन त्याचा परिणाम केबल व्यवसायावर होणार आहे; त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहक आणि केबल आॅपरेटर यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.केबल टीव्हीच्या एमआरपी कायद्यात दि. १ जानेवारीपासून ट्रायने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल दि. २९ डिसेंबरपासून लागू होणार आहे. या बदलामुळे ग्राहकांना दरमहा किमान १३० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी सहित किमान १५0 रुपयांचा बेसपॅक घ्यावा लागणार आहे.
हा पॅक घेतला नाही, तर टी. व्ही. वर एकही चॅनेल दिसणार नाही. या १५0 रुपयांमध्ये दूरदर्शनची २६ आणि इतर ७४ चॅनेल पाहता येणार आहेत. त्यापुढील अन्य चॅनेल पाहण्यासाठी किमान एक रुपया ते १९ रुपये प्रति चॅनेल द्यावे लागणार आहेत; त्यामुळे ग्राहकांना दरमहा किमान ३५०, तर जास्तीत जास्त ८०० रुपये मोजावे लागणार आहेत.ट्रायच्या नव्या धोरणाचा फटका ग्राहकांसह केबल आॅपरेटर यांना बसणार आहे. संबंधित निर्णय मागे घ्यावा. केबलचे दर परवडणारे असावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील केबल आॅपरेटरांच्या संघटनांकडून होत आहे. या मागणीकडे केंद्रसरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. त्यासह याबाबत संसदेमध्ये आवाज उठविण्यासाठी खासदार राजू शेट्टी, खासदार संभाजीराजे आणि खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन दिले आहे.
असे वाढणार दरसध्या शहरात २५० ते ३००, तर ग्रामीण भागात १२० ते १५० रुपये दरमहा केबलसाठी घेतले जातात. त्यामध्ये ४०० ते ४७० चॅनेल दाखविले जातात; मात्र, आता या बेसपॅकमुळे १३० रुपये आणि त्यावर २३ ते १८ टक्के जीएसटी असे एकूण १५० ते १५३ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनेल निवडून त्यासाठी स्वतंत्र पैसे द्यावे लागणार आहेत. किमान १0 चॅनेल घेतल्यास किमान ३५०, तर सर्व चॅनेल घेतल्यास ८०० रुपये द्यावे लागतील.
ट्रायच्या नव्या धोरणामुळे केबलचे दर दुपटीने वाढणार आहेत. वाढीव दराचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना बसणार आहे. हे नवे धोरण केबल आॅपरेटर आणि ग्राहकांना अडचणीत आणणार आहे. आॅपरेटर, ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन ट्रायने धोरणात बदल करावा.- प्रकाश महाडिक, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा केबल आॅपरेटर संघटना (एसपीएन)
नवीन दरवाढ लागू झाली, तर ग्रामीण भागातील ७० टक्के जनता मनोरंजनापासून वंचित राहणार आहे. ग्राहक कमी झाल्यास केबल व्यवसायावरील रोजगार कमी होणार आहेत; त्यामुळे ट्रायने ग्राहकांना परवडणाऱ्या २00 रुपयांत २00 चॅनेलची सुविधा उपलब्ध करून द्यावी.- विजय कुरणे, केबल आॅपरेटरकोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
- केबल ग्राहकांची संख्या : सुमारे आठ लाख
- केबल व्यवसायातील आॅपरेटर आणि कर्मचाऱ्यांची संख्या : १६००
- दरमहा होणारी उलाढाल : सुमारे १३ कोटी