कोल्हापूर : ग्राहकांचे कोणत्याही स्तरावर शोषण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी शुक्रवारी येथे दिले.तसेच ग्राहकांची फसवणूक किंवा अडवणूक होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजित ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. योवळी समितीच्या सदस्या सुप्रिया खैरनारे, सचिव राजीव अनभोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अमित माळी, महिला व बालकल्याण उपमुख्यकार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नितीन मस्के,शिक्षणाधिकारी आशा उबाळे आदी प्रमुख उपस्थित होते.ग्राहकांच्या तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन त्यांची सोडवणूक करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश देऊन विद्यार्थी सुध्दा ग्राहकच असल्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेणे गरजेचे आहे असे सांगितले. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शाळांना बचतगटाच्या माध्यमातून दिला जाणारा शालेय पोषण आहार नियमानुसार व काटेकोर पध्दतीने वितरित होणे गरजेचे आहे. याकामी अधिक पारदर्शकता आणि लोकाभिमुखता यावी या दृष्टीनेही संबंधित यंत्रणांनी दक्ष रहावे. शिक्षण विभागाने यासाठी स्वतंत्र भरारी पथक तैनात करण्याची सूचनाही त्यांनी केली.बैठकीत शालेय पोषण आहार, वैद्यमापन शास्त्र विभाग, महिला व बालविकास विभाग तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प आणि जिल्हा पुरवठा विभागाकडील कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षण विभाग, वैधमापन शास्त्राचे अशासकीय सदस्य, महिला व बालविकास विभाग व प्रकल्प अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.