कोल्हापूर : वाढता स्वाईन फ्लू आणि डेंग्यू आजार अनेकांच्या जीवावर बेतत असताना शहर आणि जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा हातावर हात धरून गप्प आहे, याबाबत नागरिकांत जनजागृती करून डेंग्यू आणि स्वाईन फ्लू आजाराला रोका, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून आरोग्य विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.डेंग्यू आणि स्वाईन फ्लू या आजाराबाबत जिल्हा रुग्णालय व महानगरपालिका प्रशासन यांची बैठक ‘सीपीआर’मधील अधिष्ठाता कार्यालयात झाली, त्यावेळी आमदार क्षीरसागर यांनी महापालिका, ‘सीपीआर’ आणि शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. सी. केम्पीपाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. व्ही. जाधव, डॉ. व्ही. ए. देशमुख, महात्मा फुले जीवनदायी योजनेचे मुख्य समन्वयक सागर पाटील यांच्यासह ‘सीपीआर’ अभ्यागत समितीचे सदस्य सुनील करंबे, अजीत गायकवाड प्रमुख उपस्थित होते.‘सीपीआर’ रुग्णालयावर शहरातील डेंग्यू आणि स्वाईन फ्लू रुग्णांचा भार पडत असल्याची तक्रार अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी आमदार क्षीरसागर यांच्याकडे केली. त्यावर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. आर. व्ही. जाधव, निरीक्षक डॉ. जयवंत पवार यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
क्षीरसागर यांनी, महापाालिकेने साथीच्या रोगाबाबत जनजागृती करावी, शहर स्वच्छ ठेवण्याबाबत दक्ष राहावे, असे आवाहन केले. यावेळी तुकाराम साळोखे, रणजित जाधव, पद्माकर कापसे, सुनील जाधव, अनिल पाटील, सुशील भांदिगरे, दीपक गौड, निलेश हंकारे, जयवंत हारुगले, आदी उपस्थित होते.आरोग्यमित्र खासगी डॉक्टरांशी सामील‘जीवनदायी’चे मुख्य समन्वयक सागर पाटील यांना आमदार क्षीरसागर यांनी, शहरातील खासगी रुग्णालयातील लूट तुम्हाला दिसली नाही का? तुमचे आरोग्यमित्र खासगी डॉक्टरांना सामील असल्याचाही आरोप केला. जीवनदायीच्या पैशाच्या लुटीबाबत तक्रारी आहेत; पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही, अशीही रुग्णालये निलंबित होण्यासाठी अहवाल पाठवा, अशाही सूचना आमदार क्षीरसागर यांनी दिल्या.