कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे कऱ्हाडच्या बसमध्ये चढताना विमा अधिकाऱ्याचे पैशाचे पाकीट चोरट्याने हातोहात लंपास केले.पाकिटामधील २५ हजार ५०० रुपये व दोन एटीएम कार्डांवरून २५ हजार रुपये काढून सुमारे ५० हजार ५०० रुपये चोरट्याने लांबविले. रविवारी (दि. ३) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.अधिक माहिती अशी, धैर्यशील गजानन पाटील (वय ३४, रा. बनपुरीकर कॉलनी, कऱ्हाड , जि. सातारा, मूळ सोनखिरे, ता. कडेगाव, जि. सांगली) हे कऱ्हाडमध्ये विमा कंपनीत अधिकारी आहेत. रविवारी ते कोल्हापुरात फर्निचरच्या कामासाठी आले होते. काम आवरून सायंकाळी सहाच्या सुमारास कऱ्हाडला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक येथे आले.
बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पॅँटच्या पाठीमागील खिशातील पाकीट चोरले. बसमध्ये चढल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पाकीट आजूबाजूला कुठे पडले आहे का, याचा शोध घेतला असता ते सापडले नाही. पाकिटामध्ये २५ हजार ५०० रुपये होते.
एटीएम कार्ड, पॅनकार्ड होते. एटीएम कार्डच्या पाकिटावर पासवर्ड (पिन) असल्याने चोरट्याने बॅँक आॅफ महाराष्ट्र शाखेच्या एटीएममधून २० हजार आणि भारती सहकारी बँकेमधून पाच हजार असे २५ हजार रुपये काढले. त्याचा संदेश पाटील यांच्या मोबाईलवर आला.
पाकीट चोरीला गेल्याची खात्री होताच त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्याचा चेहरा निष्पन्न केला आहे. चोरटा हा सराईत असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.