कोल्हापूर : राज्यात शिक्षक भरती त्वरीत करावी, यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार (दि. २६) पासून डी. टी. एड्., बी. एड्. स्टुडंट असोसिएशनतर्फे मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत एल्गार सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र उदाळे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.कार्यकारिणी सदस्य राजेंद्र उदाळे म्हणाले, राज्यातील लाखो युवक-युवती या डी. एड्., बी. एड्. पदवी घेऊनही नोकरीपासून वंचित आहेत. राज्य शासनाने यापूर्वी चारवेळा शिक्षक पात्रता परीक्षा घेतली. त्यासह गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा आॅनलाईन घेतली. मात्र, अद्यापही शिक्षक भरतीबाबत शासनाकडून कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे शासन निर्णय दि. २३ जून २०१७ च्या निर्णयानुसार २४ हजार रिक्त जागांवरील शिक्षक भरतीसाठी केंद्रीय पद्धतीने त्वरित कार्यवाही करावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांबाबत आंदोलन करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. त्याची सुरुवात मुंबईतील एल्गार सत्याग्रहाने होईल. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दोन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
या पत्रकार परिषदेस असोसिएशनचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुयश उदाळे, भूषण मिटके, सागर जाधव, प्रज्ञा माळकर, कृष्णात उदाळे, रघुनाथ कुंभार, संजय हाजगुळकर, दत्ता पालकर, आदी उपस्थित होते.
अन्य मागण्या
- * खासगी संस्थेतील शिक्षक भरती अभियोग्यता गुणानुक्रमाने करावी.
- * दि. ३ डिसेंबर २०१४ च्या शासन शुद्धिपत्रानुसार शिक्षक भरतीची कार्यवाही करावी.
- * राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा.
- * सन २०१२ नंतरची खासगी शिक्षण संस्थेतील बेकायदेशीर शिक्षक भरती रद्द करावी.
- * क्रीडाशिक्षकांची कायमची नियुक्ती अभियोग्यता चाचणीतील गुणानुक्रमे करावी.