कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, उपक्रम जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी शिक्षण वारीस भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी बुधवारी केले.तपोवन मैदान येथे सोमवार (दि. १०) ते बुधवार (दि. १२) दरम्यान ‘शिक्षणाची वारी’ उपक्रम आयोजित केली आहे. त्या ठिकाणी राज्यातील तंत्रस्नेही, उपक्रमशील शिक्षक शिक्षणात होत असलेले परिवर्तन, आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात झालेला प्रभावी वापर, विविध स्टॉलच्या माध्यमातून मांडणार आहेत.
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावीपणे होऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी या वारीतील विविध उपक्रमांचा अनुभव शिक्षकांनी घ्यावा. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी तालुकानिहाय नियोजनाप्रमाणे त्या-त्या दिवशी सकाळी अर्धवेळ शाळा भरवून दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत वारीला भेट द्यावी.
यामध्ये सोमवारी हातकणंगले, कागल, करवीर, पन्हाळा आणि महानगरपालिका शाळांतील शिक्षकांनी भेट द्यावी. मंगळवारी भुदरगड, गगनबावडा, राधानगरी व शाहूवाडी, तर बुधवारी आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि शिरोळ तालुक्यातील शिक्षकांनी शिक्षणाची वारी उपक्रमाला भेट द्यावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी उबाळे यांनी केले आहे.