कोल्हापूर : सदर बझार येथील कोरगावकर हायस्कूलच्यासमोर मुख्य रस्त्यावरच दिलीप पवार यांच्या दारात म्हैस कापण्याचा प्रकार आज, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडला. पवार कुटुंबीयांनी अडविण्याचा प्रयत्न करताच म्हैस कापण्याचा प्रयत्न करणारे पसार झाले. घडल्या प्रकाराने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. संशयित इशाक बेपारी, दस्तगीर बेपारी व मुतालिक बेपारी या तिघांना अटक करण्याची मागणी करत परिसरातील महिलांना रस्त्यावरच ठिय्या मांडला. नगरसेवक महेश जाधव यांनी लोकांना संयम राखण्याचा सल्ला देत समजूत काढल्यानेच पुढील अनर्थ टळला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी जमावाला शांत करत संशयितांना कठोर शासन करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच तणाव निवळला. घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसांत रात्री उशिरा करण्यात आली.याबाबत घटनास्थळावर फिर्यादी अशोक पवार यांनी सांगितलेली माहिती अशी, पावणे अकराच्या सुमारास संशयित बेपारी बंधू एक म्हैस घेऊन शाहू विद्यालयाच्या दिशेने निघाले होते. दिलीप पवार यांच्या दारात येताच त्यांनी म्हशीवर कोयत्याने घाव घालण्यास सुरुवात केली. रक्ताच्या चिळकांड्या उडत असतानाही त्यांनी म्हशीवर घाव घालणे सुरूच ठेवले. पवार कुटुंबीयांनी आमच्या दारात का म्हैस कापतोस, असे म्हणत त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे परिसरातील तरुण मोठ्या संख्येने जमा झाले. त्यानंतर संशयित बेपारी बंधूंनी पलायन केल्याचे अशोक पवार यांनी सांगितले.बेपारी बंधूंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत परिसरातील महिलांनी कोरगावकर हायस्कूलच्या दारातच ठिय्या मांडला. जमाव प्रक्षुब्ध बनू नये यासाठी नगरसेवक महेश जाधव यांनी समजूत काढत होते. दरम्यान, पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. सदर बझारमध्ये जनावरे कापण्याचे प्रकार वारंवार घडतात. महापालिकेकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाही, असा आरोप करत जमावाने कारवाईची मागणी केली. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेऊन जमावाला संशयितांवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर तणाव निवळला. महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी गाडी व मजूर मागवून मेलेल्या म्हशीला हटविले. अग्निशमन दलाची गाडीने पाणी मारून रस्ता साफ करण्यात आला. (प्रतिनिधी)
राजकीय रंग म्हैस कापली या प्रकरणास जातीय रंग देऊन ऐन निवडणुकीत कायदा व सुवस्था बिघडू नये याची धास्ती पोलिसांना लागली होती. घटनास्थळी शंभराहून अधिक पोलिसांसह पाच पोलीस निरीक्षकांना पाचारण करण्यात आले होते. नगरसेवक महेश जाधव यांनी पोलीस येईपर्यंत जमावाची समजूत काढत शांत करण्याचा प्रयत्न केला.