विश्र्वास पाटील -कोल्हापूर : विधानसभा निवडणूकीतील कोल्हापूर जिल्ह्यातील महायुती व महाविकास आघाडीतील संभाव्य उमेदवारांचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होताना दिसत आहे. साधारणत: १४ ऑक्टोबरला दसऱ्यानंतर निवडणूकीची घोषणा होऊ शकते. १५ किंवा १६ नोव्हेंबरला मतदान झाले तर नवे सभागृह २७ पर्यंत सत्तेत येवू शकते. मतदानानंतर सरकार अस्तित्वात येण्यासाठी दहा दिवस हाती राहतात. साधारणत हाच अंदाज घेवून संभाव्य इच्छुकांनी आपपल्या मतदार संघातील मोर्चेबांधणी व आचारसंहितेच्या अगोदरची कामे पूर्ण करून घेण्यावर सपाटा लावला आहे.
महायुतीत कोल्हापूर उत्तर, करवीर, चंदगड आणि शिरोळला बंडखोरीचे चिन्हे दिसतात. महाविकास आघाडीत राधानगरी, चंदगडला बंडखोरी थोपवण्याचे आव्हान असेल.
निवडणूकीची संभाव्य तारीख पाहता आचारसंहिता लागू होण्यास १६ दिवसच राहतात. त्यामुळे प्रत्येक मतदार संघातील वातावरण कमालीचे तापू लागले आहे. त्यातही कागल, राधानगरी, चंदगड, इचलकरंजीमधील वातावरण अधिकच तापले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवाराची अडचण आली आणि उध्दवसेनेने फारच जोर लावला तर ही जागा त्यांना देवून राधानगरीची जागा काँग्रेसला घेता येवू शकते. उध्दवसेनेकडून संजय पवार यांचा विचार होवू शकतो.
राधानगरीत के.पी.पाटील यांना उमेदवारी दिल्यास ए.वाय.पाटील यांचे काय करायचे हा मोठा गुंता आहे. ते यावेळेला कोणत्याही स्थितीत लढणारच म्हणून मैदानात उतरले आहेत. या दोघांतील वाद मिटत नाही तोपर्यंत तेथील लढत अटीतटीची होत नाही. चंदगडला शिवाजीराव पाटील, मानसिंग खोराटे यांनी प्रचार सुरु केलाच आहे. अप्पी पाटीलही लढण्याच्या तयारीत आहेत. इचलकरंजीत आता तरी एकास एक लढत द्यायच्या हालचाली सुरु आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित झाल्यास सत्यजित कदम कोणते पाऊल उचलतात हे महत्वाचे ठरेल. कारण त्यांच्या राजकीय करिअरच्या दृष्टीने ही निवडणूक निर्णायक असेल. तिसऱी आघाडी आकारास आल्यास उमेदवार संख्या आणि दोन्ही पक्षांची डोकेदुखीही वाढेल.
कोल्हापूरातील महायुती व महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवारमतदार संघ - महायुती - महाविकास आघाडी
कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर (शिंदेसेना) - काँग्रेस उमेदवाराबद्दल संभ्रमकोल्हापूर दक्षिण - शौमिका महाडिक (भाजप) - ऋतुराज पाटील (काँग्रेस)
करवीर - चंद्रदिप नरके (शिंदेसेना) - राहूल पाटील (काँग्रेस)राधानगरी - प्रकाश आबिटकर (शिंदेसेना) - के.पी.पाटील (उध्दवसेना)
शाहूवाडी - विनय कोरे (जनसुराज्य) - सत्यजित पाटील (उध्दवसेना)कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) - समरजित घाटगे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
चंदगड - राजेश पाटील (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) - डॉ.नंदिनी बाभूळकर (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)हातकणंगले - अशोकराव माने (जनसुराज्य) - राजूबाबा आवळे (काँग्रेस)
शिरोळ - राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष) - उल्हास पाटील (उध्दवसेना)इचलकरंजी - राहूल आवाडे (भाजप) - मदन कारंडे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
महायुतीतील जागावाटप
शिंदेसेना (एकूण ३) : कोल्हापूर उत्तर,करवीर आणि राधानगरीभाजप (२) : कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी
राष्ट्रवादी अजित पवार पक्ष (२) : कागल, चंदगडजनसुराज्य शक्ती (२): शाहूवाडी, हातकणंगले.
अपक्ष किंवा स्थानिक आघाडी (१) : शिरोळ
महाविकास आघाडीतील जागावाटपकाँग्रेस (४) : कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर, आणि हातकणंगले.
उध्दवसेना (३) : राधानगरी, शाहूवाडी आणि शिरोळराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष (३) : कागल, चंदगड आणि इचलकरंजी
शिरोळमधील गुंता..आमदार राजेंद्र यड्रावकर हे त्यांच्या भावाने स्थापन केलेल्या राजर्षि शाहू आघाडी किंवा अपक्ष म्हणून रिंगणात राहतील अशी चिन्हे आहेत. त्यांना महायुतीने पुरस्कृत केले तर अडचण नाही परंतू त्यांनी युतीशी फारकत घेतली तर या मतदार संघातून गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे यांची चर्चा नव्याने जोरात सुरु झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवारही तिथे रिंगणात असेल. त्यामुळे गुंतागुंत अधिकच वाढेल. आघाडीतून काँग्रेसकडून गणपतराव पाटील यांचे नांव पुढे आहे. परंतू काँग्रेसचीच उमेदवारी असेल तरच ते रिंगणात उतरू इच्छितात. आता नाही तर कधीच नाही असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते. मध्यममार्गी स्वभाव, वयाचा मुद्दा, फायटिंग स्पिरीट या पातळीवर त्यांच्या उमेदवारीचा कस लागेल.