कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या संचारबंदीच्या निर्णयात राज्य शासनाने अंशत: बदल केला आहे. संचारबंदी मागे घेऊन फक्त जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे आता येथून पुढे पाच जानेवारीपर्यंत रात्री अकरा ते सकाळी ६ या वेळेत बाहेर फिरता येणार आहे, पण एकाच ठिकाणी पाचहून अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही.
ब्रिटनमध्ये कोरोनासदृश नव्या आजाराचा प्रसार झाल्याच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांच्या माध्यमातून प्रादुर्भाव वाढू नये, याची दक्षता म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली होती. तथापि यावरून बरीच टीका झाल्यानंतर या संचारबंदीच्या आदेशात किरकोळ सुधारणा केली गेली आहे. याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
त्यानुसार कोल्हापुरातही या संचारबंदीच्या आदेशात किरकोळ बदल करून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत आता नागरिकांना मुक्तपणे संचार करता येणार आहे. पोलीस त्यांना अटकाव करणार नाहीत. पण पाचपेक्षा जास्त लोकांनी मात्र एकत्र जमता कामा नये, अशी अट घालण्यात आली आहे.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाो गलांडे यांच्याकडे विचारणा केली असता, शासन आदेशानुसार हा बदल लागू करण्यात आला आहे, त्याचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संचारबंदी शिथिल, तरी लाभ नाहीच
रात्रीच्या संचारबंदीतून नागरिकांची सुटका झाली असली तरी जमावबंदी कायम असल्यामुळे, सवलत मिळूनही काही उपयोग होणार नाही. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी आयोजनांवर निर्बंध कायम राहणार असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. रात्री अकरापर्यंतच हॉटेल्स सुरू ठेवण्याची मुभा असणार आहे.