कोल्हापूर : कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा साक्षीदार असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहासाठी एक रुपयाचीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. विषयपत्रिकेवरील मजकुराच्या ‘कॉपी-पेस्ट’ घोळातून भाडेवाढीचा मुद्दा मांडला गेला. प्रत्यक्षात मात्र सन २०१८-१९ या कालावधीत नाट्यगृहासाठी गतवर्षीप्रमाणेच भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे रंगकर्मी आणि नाट्यसंस्थांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.नूतनीकरणानंतर नव्या दिमाखात मायबाप रसिक प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध झाली. मात्र आधीच कोल्हापुरात नाटके होत नसताना केलेली भाडेवाढ अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करीत रंगभूमीवरील कलाकार व नाट्यसंस्थांनी त्याला विरोध केला आहे. याबाबत विचारले असता प्रत्यक्षात एक रुपयाही भाडेवाढ करण्यात आलेली नसल्याची माहिती व्यवस्थापक विजय वणकुद्रे यांनी दिली.दरवर्षीच्या आर्थिक तरतुदीत नाट्यगृहाच्या दरनिश्चितीचा प्रस्ताव नाट्यगृहाने महापालिकेला सादर करावा लागतो. या स्थायी समितीनंतर पुढे महापालिकेच्या सभेत त्या प्रस्तावाला मान्यता दिली जाते. सभेच्या निर्णयानुसार पुढील आर्थिक वर्षासाठी नाट्यगृहाचे भाडे आकारले जाते.
यंदा हा दर निश्चितीचा प्रस्ताव पाठविताना विषयामध्ये ‘कॉपी-पेस्ट’ करण्याच्या नादात नाट्यगृहाच्या भाडेवाढीचा उल्लेख करण्यात आला. मात्र प्रस्तावाच्या पूर्ण मजकुरात कोठेही भाडेवाढीचा किंवा मूळ रकमेत किती रकमेची भाडेवाढ करण्यात आली आहे, याचा उल्लेख नाही.
तथापि सुरुवातीला विषयातच भाडेवाढीचा शब्द आल्याने सर्वांचाच असा समज झाला की, नाट्यगृहाची भाडेवाढ करण्यात आली आहे. नाट्यगृहाचे नूतनीकरण आणि संवर्धनाचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच भाडेवाढीच्या प्रस्तावाचा विचार करता येईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी सर्व रंगकर्मी आणि नाट्यसंस्थांना दिलासा मिळाला आहे.
नाट्यगृहाचे सध्याचे भाडे (लाईट, एसीसह )नाटकांसाठी : १० हजार ९२७ (स्थानिक संस्थांना १५०० रुपये सूट )अन्य समारंभासाठी : १३ हजार ८७७सांस्कृतिक कार्यक्रमासाठी : १० हजार ९२७ (साउंड सिस्टीमशिवाय)खासबाग मैदानाचे भाडेविनातिकीट कार्यक्रम : १५ हजारतिकीट लावून कार्यक्रम : १७ हजार
साउंड सिस्टीम चांगली; पण...नाटक किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या सादरीकरणादरम्यान अनेकदा प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचत नाही, अशी तक्रार आहे. त्यामुळे नव्याने बसविण्यात आलेल्या साउंड सिस्टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. प्रत्यक्षात नाट्यगृहाची साउंड सिस्टीम अतिशय चांगली आणि आधुनिक पद्धतीची आहे; पण ती आॅपरेट करण्यासाठी प्रशिक्षित टेक्निशिअन नसल्याने हा अडथळा येतो. त्यामुळे सांस्कृ तिक कार्यक्रम करणाºया संस्थांना स्वत:ची साउंड सिस्टीम आणा, असे सांगितले जाते.