कोल्हापूर : हातकणंगलेत तालुक्यातील नवे पारगाव येथील आठवडा बाजार ओटे लिलाव प्रक्रियेतील गैरकारभाराबाबत गेली तीन वर्षे तक्रार करूनही याबाबत दखल घेतली गेली नाही. तक्रारदार प्रभाकर साळुंखे यांनी आपली ही कैफियत ‘लोकमत’कडे मांडली आहे.पणन विभागाच्या अनुदानातून २०१४ मध्ये ओट्यांचे बांधकाम झाले. जानेवारी २०१५ पासून ग्रामपंचायतीने रीतसर प्रक्रिया करून बाजाराची करवसुली सुरू करणे अपेक्षित असताना कोणत्याही कराराविना पाराशर हौसिंग सोसायटीला करवसुली करण्याची परवानगी दिली.
प्रत्यक्ष पावत्या पाहता सुमारे चार लाख रुपये कर जमा केला आहे; तर उत्पन्न-खर्चाच्या पत्रकावर हीच रक्कम सव्वादोन लाख रुपये आहे. २०१६/१७ मध्येही वर्षाला ९० हजार कर गोळा होत असताना केवळ ३० हजार रुपयांना हा ठेका देण्यात आला आहे.
यानंतर पुन्हा २०२१ पर्यंतचा करवसुली ठेका देण्यासाठी जाहिरात काढण्यात आली. मात्र आधीचे ठेकेदार किरण जाधव हे याविरोधात न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे. या सर्व प्रकरणामध्ये ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान होत आहे.याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले तरीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडून गेल्या तीन वर्षांमध्ये दोषींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याची खंत साळुंखे यांनी व्यक्त केली आहे.