कोल्हापूर : करिअर करण्यासाठीची आवड आणि इच्छा यांचा विचार करून अकरावीतील प्रवेशासाठी विद्याशाखेची निवड करा, असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांनी मंगळवारी येथे केले.शहरातील विविध महाविद्यालयांतील अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि करिअर निवडीबाबत विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी या प्रवेश प्रक्रिया समितीतर्फे उदबोधन वर्ग आयोजित केले आहेत. त्यांच्या प्रारंभावेळी ते बोलत होते.
विवेकानंद महाविद्यालयातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनातील या कार्यक्रमास प्रा. टी. के. सरगर, रवींद्र पोर्लेकर, आर. ए. हिरकुडे उपस्थित होते.
संपतराव गायकवाड म्हणाले, शिक्षणाने समृद्ध होण्याबरोबरच संस्कारांनी प्रगल्भ असणाऱ्या पिढीची समाजाला आवश्यकता आहे. करिअरची निवड करताना कलक्षमता जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दहावीनंतर गुणांच्या मोजपट्टीवर स्पर्धा करण्यापेक्षा बौद्धिक कल, व्यक्तिमत्त्वातील गुणवत्तेच्या जोरावर स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, कसोटीवर उतरण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी सुसंवादातून मार्ग काढणे महत्त्वाचे ठरणारे आहे. या कार्यक्रमात प्रा. सरगर यांनी अर्ज करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.
प्रा. हिरकुडे यांनी ओएमआर पद्धतीविषयी, तर रवींद्र पोर्लेकर यांनी प्रवेश प्रक्रियेच्या कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन केले. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे कार्याध्यक्ष प्रा. आर. के. शानेदिवाण, एम. आर. नवले, आर. व्ही. कोळेकर, एम. ए. पीरजादे, आदी उपस्थित होते. विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली.
दरम्यान, बुधवारी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत राम गणेश गडकरी सभागृह पेटाळा आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत कॉमर्स कॉलेजमध्ये उद्बोधन वर्ग घेण्यात येणार आहे.