कोल्हापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या समर्थनार्थ शाहूवाडी तालुक्यातून आलेल्या ३०० पैकी ५० जणांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय याबाबतच्या चौकशी समितीने घेतला आहे. समितीचे सदस्य अरुण इंगवले आणि प्रसाद खोबरे यांनी ही माहिती दिली.लोहार यांच्याविरोधात जिल्हा परिषदेचे सदस्य आक्रमक होऊन चौकशी समितीची स्थापना झाली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. यासाठी तीन वेळा बैठक बोलावून तक्रारदारांची सुनावणी घेण्यात आली आहे. याच दरम्यान २६ आॅक्टोबर रोजी लोहार यांच्या शाहूवाडी तालुक्यातून एकाच दिवशी जिल्हा परिषदेकडे त्यांच्या समर्थनार्थ ३०० पत्रे आली होती.लोहार यांचे काम चांगले असून, केवळ आकसापोटी त्यांच्याविरोधात हे सर्व सुरू असल्याचा एकच मजकूर या पत्रामध्ये आहे.
यामध्ये पत्र लिहिणाऱ्यांचे सविस्तर पत्तेही नसून, एकाच व्यक्तीने सह्या मारल्याचे जाणवते. या पार्श्वभूमीवर चौकशी समितीने समर्थन देणाऱ्या ३०० पैकी ५० जणांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे.‘लोहार यांनी आपल्या कारकिर्दीत जी काही चांगली कामे केली आहेत, ती तुम्ही सांगा,’ असे या समर्थन करणाºयांना सांगण्यात येणार आहे. एकूण ३०० संख्येत असणारी ही पत्रे ‘मॅनेज’ असल्याचे बोलले जात आहे.
चौकशी समिती अधिकृतचजिल्हा परिषदेने आपल्या चौकशीसाठी नेमलेली समितीच बेकायदेशीर असल्याचा दावा ‘मॅट’मधील याचिकेमध्ये लोहार यांनी केला होता. याला जिल्हा परिषदेने मंगळवारी (दि. ४) ‘मॅट’मध्ये लेखी उत्तर सादर केले आहे. जिल्हा परिषद नियम १९६३, जिल्हा परिषद कायदा ७८/१२ यानुसार लोहार यांच्या चौकशीची स्थापना करण्यात आली आहे, असे आपले म्हणणे जिल्हा परिषदेने सादर केले आहे.