कोल्हापूर : कोल्हापूर शहरात विखुरलेल्या कृषी कार्यालयांना एकाच छताखाली आणणाऱ्या ‘कृषी भवन’ला मान्यता मिळाल्याच्या अडीच महिन्यांतच शेंडा पार्कातील तीन एकर जागाही उपलब्ध झाली आहे.
शासनानेच तसे आदेश काढून २९ कोटी ८० लाखांच्या निधी मागणीसह बांधकामाचा प्रारूप आराखडा तयार करण्यासही सांगितले आहे. त्यानुसार मार्चपर्यंत अहवालाचे सादरीकरण केल्यानंतर येत्या अर्थसंकल्पात तरतुदीला प्रशासकीय मान्यता मिळून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे.कृषी उत्पादनाच्या बाबतीत राज्यातील सर्वांत सधन जिल्हा असूनही कोल्हापुरातील प्रमुख कृषी कार्यालयांना स्वत:ची जागा नसल्याने स्थापनेपासून भाड्याच्याच कार्यालयातून त्यांचे कामकाज चालत आहे. जवळपास ११ कार्यालये शहरात विविध ठिकाणी विखुरलेली आहेत. कोट्यवधींचे भाडे यासाठी भरले गेले; पण एकही नवीन इमारत झाली नाही.
जुन्याच आणि त्याही भाड्याच्या कार्यालयांतून जिल्ह्यातील कृषी कार्यालयाचा संसार चालविला जात आहे. ही सर्व कार्यालये एकत्र यावीत यासाठी मागणी झाली; पण तिचा पाठपुरावा झाला नाही. कृषी महाविद्यालयाकडून शेंडा पार्कातील जागा दिली जात नसल्याने ‘भवन’चा विषय मागणीपुरताच राहिला. अखेर विद्यमान सरकारमधील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यात पुढाकार घेत आॅक्टोबरमध्ये कृषी भवनच्या प्रस्तावाला मान्यता मिळवून दिली.कृषी महाविद्यालयाने तयारी दर्शविल्याने अखेर १.१४ हेक्टर जागेवर कृषी भवन उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने तसे आदेश काढून ही जागा ताब्यात घेण्यास सांगितले आहे. शेंडा पार्कातील कृषी महाविद्यालयाच्या जुन्या क्वार्टर्सशेजारील वीज मंडळाच्या पारेषण केंद्राजवळील जागा निश्चित झाली आहे.
यासाठी १४ कोटी ९० लाखांचे दोन असे एकूण २९ कोटी ८० लाखांचे इस्टिमेट मार्चपर्यंत सादर करायचे आहेत. जागा हातात आल्यानंतर आता निधीसह अन्य बांधकामांच्या प्रशासकीय मान्यतेकरिता शासनाकडे पाठपुरावा होणार आहे. एप्रिलनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भवनच्या बांधकामाचे काम हाती घेतले जाणार आहे.
कृषी भवन २0२0 मध्ये अस्तित्वात येणार
कृषी भवनची मान्यता, जागा असे दोन महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. आता निधीसाठी अर्थसंकल्पात तरतुदीसह प्रत्यक्ष बांधकामाबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. मार्चला मान्यता मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकामकडून पुढील कार्यवाही होणार आहे. साधारणपणे २०२० मध्ये कृषी भवन तयार होऊन तेथे शहरातील सर्व कृषी कार्यालये एकत्र येणार आहेत. ज्ञानदेव वाकुरे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
ही कार्यालये येणार एका छताखालीजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, आत्मा प्रकल्प संचालक, करवीर तालुका कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, मृदा सर्वेक्षण, रासायनिक खते, कीटकनाशके पृथक्करण प्रयोगशाळा, भांडारगृह, अभ्यागत व अभिलेखा कक्ष, शेतकरी प्रशिक्षण, वसतिगृह, ग्रंथालय, थेट माल विक्री केंद्र.