कोल्हापूर : कला क्षेत्रातील करिअरच्या नवनवीन संधीमुळे एकेकाळी दुर्लक्षित असलेल्या कलामहाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अक्षरश: झुबंड उडाली आहे. फौंडेशन आणि उपयोजित कला या दोन वर्गांतील प्रत्येकी ३० क्षमतेच्या विद्यार्थी वर्गांसाठी शंभरहून अधिक अर्ज आले आहेत.काही वर्षांपूर्वीपर्यंत चित्रकला या विषयाकडे केवळ छंद या दृष्टीने पाहिले जायचे. त्यामुळे करिअर म्हणून हे क्षेत्र नेहमीच दुर्लक्षित राहिले; मात्र गेल्या पाच सहा वर्षात जाहिरात, अॅनिमेशन, डिझायनिंग, वेब मिडिया, वर्तमानपत्रे, प्रिटींग प्रेस, फॅशन डिझायनिंग, इंटिरिअर डेकोरेशन, डिजीटायझेशन, मालिका, चित्रपट या क्षेत्रांची झपाट्याने वाढ झाल्याने कलेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील दळवीज आर्टस इन्स्टिट्युट, रा. शी. गोसावी कलानिकेतन आणि कलामंदिर या तीनही कलामहाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे.या तीनही कलामहाविद्यालयांमध्ये फौंडेशन या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रवेश मर्यादा ३० इतकी आहे. त्यासाठी शंभरहून अधिक अर्ज आले आहेत. उपयोजित कला (कमर्शियल आर्ट) हा अभ्यासक्रम केवळ कलानिकेतन महाविद्यालयात शिकवला जातो.
या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा फार मोठा ओढा असून त्यातील ३० जागांसाठी शंभरच्या आसपास अर्ज आले आहेत. याशिवाय इलिमेंटरी, इंटरमिजीएट, अॅडव्हान्स आणि डिप्लोमा या वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा कोरम पूर्ण भरला आहे. क ला शिक्षक या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी असल्याने प्रवेशक्षमतेपेक्षा कमी विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत अशी माहिती कलानिकेतनचे प्रा. मनोज दरेकर यांनी दिली.
कॅम्पसमधून नोकरीच्या संधीकाही दिवसांपूर्वीच दळवीज आर्टस इन्स्टिट्युटमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आल्या. त्यामध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांची निवड होऊन मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये मोठ्या वार्षिकपॅकेजसह हे विद्यार्थी नोकरीच्या ठिकाणी रुजू झाले आहे. मुख्यत्वे अॅनिमेटर आर्टीस्ट, डिझायनर म्हणून या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतात, अशी माहिती प्राचार्य अजेय दळवी यांनी दिली.