कोल्हापूर : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवून शहरातील तिघांची ११ लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. पुष्कराज शरदचंद्र सावंत (रा. डफळे कॉलनी, उचगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत मोहन कृष्णाप्पा भंडारे (वय ६२, रा. क्रशर चौकजवळ, साने गुरुजी वसाहत) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.
------------------------------------------------------
मटका अड्डा उद्ध्वस्त; सहा अटकेत
सांगली : कुपवाड (ता. मिरज) येथील मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून रोख रकमेसह २ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बुकीचालकासह सहाजणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांत बुकीचालक झाकीर बाबासाहेब मुजावर, शकील नसीसाब ढोले, रज्जब मुसा मुजावर, भीमराव बाबूराव शिंदे, दशरथ रामचंद्र जावळे, नासीर कासीम मुश्रीफ या सहाजणांचा समावेश आहे.
------------------------------------------------------
टाकीमधून गरम वाफ बाहेर आल्याने कामगाराचा मृत्यू
कोरेगाव (जि. सातारा) : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिल्समध्ये बॉयलिंग हाऊस सेक्शनच्या उसाच्या रस्त्याच्या टाकीतून अचानक गरम वाफ बाहेर आल्याने एका कामगाराचा भाजून मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी आहेत. संभाजी शंकर घोरपडे (वय ४५, रा. शिरढोण) असे मृत कामगाराचे नाव आहे. कारखान्याच्या उभारणीपासून संभाजी घोरपडे हे काम करीत होते.
------------------------------------------------------
लोटेतील दोन कंपन्यांना उत्पादन बंदचे आदेश
खेड (जि. रत्नागिरी) : खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील आवाशीनजीकच्या नाल्यात टँकरमधून घातक रसायन सोडल्याप्रकरणी योजना इंडस्ट्रीज व वनविड या दोन कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाने दिले आहेत. ग्रामस्थांनी पहारा ठेवत आवाशीनजीकच्या नाल्यात घातक रसायन ओतणारे दोन टँकर चालकाना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. हे दोन्ही टँकर योजना इंडस्ट्रीज व वनविड कंपनीत आले असल्याचे निष्पन्न झाले होते.
------------------------------------------------------
होडी वाहतूक, जलक्रीडा प्रकारांना बंदर विभागाचा ‘खो’
मालवण (जि. सिंधुदुर्ग) : जिल्हाधिकारी यांच्या सशर्त परवानगीने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिवाळी कालावधीत होडी वाहतूक आणि जलक्रीडा प्रकार सुरू करण्यात आले होते. मात्र, प्रवासी होडी वाहतूक, पॅरासेलिंग व अन्य सागरी जलक्रीडा प्रकार तत्काळ बंद करण्याचे आदेश बंदर विभागाने दिले आहेत. यामुळे पर्यटन व्यावसायिकांत खळबळ उडाली असून, बंदर विभागाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. बंदर विभागाच्या या भूमिकेमुळे मालवणात आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला.