कोल्हापूर : शिवाजी महाराजांच्या नावाची केवळ घोषणा देणे योग्य नाही; तर त्यांचा इतिहासही समजून घेतला पाहिजे. गडकिल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा प्रयत्न सर्वांना केला पाहिजे. किल्ल्यांच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी केले.शाहू स्मारक भवन येथे युवा सेनेच्या वतीने ‘गडकिल्ले स्पर्धा २०१८’ या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार होते.गुरव म्हणाले, मुलांनी कट्ट्यावरच्या गप्पा सोडून गड-कोट-किल्ले पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना रानावनांत किल्ल्यांची मनसोक्त भटकंती करण्याची मुभा द्यावी व पालकांनी स्वत: त्यामध्ये सहभागी व्हावे.यावेळी संजय पवार म्हणाले, गडकोट-किल्ले आपण पाहतो, पुस्तके वाचतो; मात्र त्यांचे संवर्धन होणेही तितकेच गरजेचे आहे. पन्हाळगडावर शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. तिथे नतमस्तक होऊन गडाची पाहणी करावी, असे आवाहनही संजय पवार यांनी यावेळी केले.युवा सेनेच्या माध्यमातून युवा सेना विस्तारक हर्षल सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. कोल्हापूर शहरामधील जवळपास ७२ मंडळांच्या ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आली. युवा सेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने यांनी प्रास्ताविक केले. सागर पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना महिला शहर संघटक रिया पाटील, चैतन्य अष्टेकर, अभिजित भोसले, सागर पाटील, जयकुमार पाटील, राजू यादव, जयराम पवार, दिनेश परमार, धनराज काळे, आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल असाप्रथम क्रमांक : ओम दत्त चिले मित्रमंडळ (नरताळा किल्ला), दुसरा क्रमांक : शिवराय ग्रुप (सुवर्णदुर्ग किल्ला), तिसरा क्रमांक : हडक्या ग्रुप (विजयदुर्ग किल्ला) आणि उत्तेजनार्थ : प्रथम हिंदवी ग्रुप (जंजिरा किल्ला), शिवनेरी बालमित्र वॉरियर्स (जाणता राजा) यांना शिवाजी महाराज यांची मूर्ती व पुस्तक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमामध्ये किल्ले बनविण्यात सहभागी झालेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला. परीक्षक अमित आडसूळ आणि सूरज ढोले यांचाही सत्कार करण्यात आला.