कोल्हापूर : प्रवाशांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत इंडिगो कंपनीने कोल्हापूर- तिरुपती ही विमानसेवा शुक्रवारपासून बंद केली आहे. मात्र, विमान प्राधिकरण व प्रवाशांनी या सेवेबाबत आग्रह धरल्याने कंपनीने कोल्हापूर- हैदराबाद ही विमानसेवा तिरुपतीपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा आज शनिवारपासून सुरू होणार आहे.कोल्हापुरातून तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोल्हापूर- तिरुपती ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेला प्रतिसादही चांगला मिळत होता. मात्र, कंपनीने प्रवाशांची संख्या कमी असल्याचे सांगत ही सेवा १५ डिसेंबरपासून बंद करण्यात येणार असल्याचे विमानतळ प्रशासनाला कळविले होते.यावर विमान प्राधिकरणाने त्यांना हैदराबादमार्गे तिरुपती सेवा सुरू ठेवण्याची विनंती केली. इंडिगो कंपनीने ही मागणी मान्य केली असून आज शनिवारपासून कोल्हापूर- हैदराबाद- तिरुपती अशी विमानसेवा आज सुरू होणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरण संचालक अनिल शिंदे यांनी दिली. ७५ प्रवासी क्षमता असणारे हे विमान आता हैदराबादमध्ये थांबा घेऊन तिरुपतीला रवाना होईल.
- कोल्हापुरातून प्रस्थान : दुपारी १:३५ वाजता
- तिरुपतीला पोहाेचणार : ४:५० वाजता
- प्रवासी क्षमता : ७५