कोल्हापूर : बाजार समित्यांचे नियमन रद्द केल्याने तोलाईदार अडचणीत आले आहेत. यासाठी तोलाईदार कामगारांचा बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये समावेश केला जाणार असून, त्याचे परिपत्रक सरकारकडून जारी केल्याची घोषणा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष व माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी केली. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने बाजार समितीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.नरेंद्र पाटील म्हणाले,‘माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून घरकुल, रेल्वे धक्का हे प्रश्न जिव्हाळ्याचे आहेत. मागील सरकारच्या काळात कमी केलेल्या कामगारांना पुन्हा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. रेल्वेच्या किती वॅगन खाली केल्या आणि त्या कोणी केल्या याची रेल्वे प्रशासनाकडे मागितलेली माहिती ते देत नाहीत.
रेल्वे कोणाच्या बापाची पेंड आहे काय? आमचा कामगार गुंड, गुन्हेगारी स्वरूपाचा आहे काय? असा सवाल करत त्याला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. गांधीनगर येथील गुमास्ता कामगारांना न्याय देण्यासाठी सरकारच्या पातळीवर ताकदीने प्रयत्न करणार असून जर न्याय मिळाला नाही तर लढा उभारण्याची तयारी ठेवा.खासदार महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूरचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना रेल्वे, विमान, पासपोर्टसह ईएसआय हॉस्पिटल, आदी कामे प्राधान्याने मार्गी लावली. आगामी काळातही सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करीत राहू. माथाडी कामगारांचा ‘ईएसआय’मध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करू.बाजार समितीचे संचालक बाबूराव खोत यांनी प्रास्ताविक केले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. नरेंद्र पाटील व खासदार महाडिक यांचा सत्कार युनियनच्या वतीने करण्यात आला. यावेळी समितीचे सभापती कृष्णात पाटील, उपसभापती अमित कांबळे, उत्तम धुमाळ, माथाडी कामगार युनियनचे आकाराम केसरे, कृष्णात पाटील, संभाजी आबणे, रावसाहेब कोळी, दीपक पाटील, अमर शिंदे, दिलीप पवार, आदी उपस्थित होते.