कोल्हापूर : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. पाचवीच्या परीक्षेत ४१.६३ टक्के आणि आठवीच्या परीक्षेत २८.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्यात हा निकाल सर्वाधिक ठरला आहे. पाचवीचे ५९१ विद्यार्थी तर आठवीचे ५७१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने ३१ जुलै २०२२ रोजी या रीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा अंतिम निकाल ३ जानेवारीला जाहीर करण्यात आला. या दोन्ही गटाच्या परीक्षांमध्ये सर्वाधिक उत्तीर्ण होणारे आणि शिष्यवृत्तीस पात्र ठरणारे विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. पाचवीच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील ४१.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याचे हेच प्रमाण २३.९० टक्के इतके आहे.
आठवीच्या परीक्षेत जिल्ह्यातील २८.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याचा हाच निकाल १२.५३ टक्के इतका लागला आहे. यंदा पाचवीपेक्षा जिल्ह्यातील आठवीचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचे प्रमाण जास्त आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थीही याहीवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
परीक्षा | सहभागी शाळा | शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी | निकाल टक्केवारी |
पाचवी शिष्यवृत्ती | २१४१ | ५९१ | ४१.६३ |
आठवी शिष्यवृत्ती | २१४१ | ५७१ | २८.३३ |