कोल्हापूर - नाताळच्या पार्श्वभूमीवर सलग मिळालेल्या सुटीमुळे कोल्हापूर अक्षरश: पर्यटकांनी बहरले होते. त्यामुळे रविवारी सलग दुस-या दिवशी दिवसभर अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर यात्रीनिवास, हॉटेल्स, धर्मशाळा ‘फुल्ल’ झाली होती. महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, चप्पल लेन, भवानी मंडपात तर जणू पर्यटकांचा जथ्य्यामुळे मांदियाळीचेच रूप आले होते.
चौथा शनिवार व रविवार व सोमवार अशा सलग तीन सुट्ट्या मिळाल्याने राज्यासह परराज्यांतील पर्यटकांनी करवीरनगरीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत दीड लाखांहून अधिक पर्यटकांनी कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व शहरास भेट दिली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शनमंडप उभे केले आहेत. ‘खिसेकापूपासून सावध रहा’, ‘किमती व मौल्यवान वस्तू सांभाळा’, ‘लहान मुले सांभाळा’ असा पुकारा माईकवरून सातत्याने दिला जात होता. अनेक भाविकांनी एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी असूनही देवीचे दर्शन चांगले झाल्याची भावना व्यक्त केली. बिंदू चौक येथे दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान कॉमर्स कॉलेजकडील मार्ग, देवल क्लबकडील मार्ग, शाहू टॉकीजकडील या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यासह बिंदू चौक पार्किंग तर ओसांडून वाहत होते.
शहरातील प्रमुख मार्ग गजबजलेला
सलग सुट्यांमुळे शहरात प्रवेश करणाºया पर्यटकांबरोबर शाळांच्या सहलींमुळे शहराचे प्रमुख मार्ग गजबजलेले. त्यामुळे ताराराणी चौक, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, रंकाळा परिसर, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी आदी भागांत वाहनांच्या रांगा आणि वाहतुकीची कोंडी असे चित्र दिवसभर पाहण्यास मिळाले. बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी असे चित्र वारंवार दिसले. ते हलवताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. गेले दोन दिवस शहर वाहतूक शाखेकडून एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षकांसह २४ कर्मचारी वाहतूक व्यवस्था मार्गी लावण्यासाठी तैनात केले होते.
कोल्हापुरी पाहुणचाराचा आस्वाद
कोल्हापुरी मिसळ आणि ‘तांबडा-पांढरा’ची चव काय न्यारीच त्यामुळे दिवसभर शहरातील प्रसिद्ध मिसळ केंद्रे व हॉटेल्समध्ये पर्यटकांच्या मिसळ खाण्यासाठी व जेवणासाठी रांगा लागल्या होत्या. यासह कोल्हापूर चप्पल, गूळ आणि स्वस्त फळे घेण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी दिसत होती.
अंबाबाई दर्शनानंतर अनेक पर्यटकांनी जवळील ठिकाण म्हणून न्यू पॅलेस; तर काहींनी देवीच्या दर्शनानंतर, पन्हाळा, जोतिबा, नृसिंहवाडी गाठणे पसंत केले. सलग सुटीमुळे कोल्हापूरच्या मुक्कामानंतर कोकणकडे पर्यटकांचा ओढा जाणवला. विशेषत: नूतन वर्ष साजरे करण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आदी ठिकाणी जाण्यासाठी रत्नागिरी राज्यमार्ग, राधानगरी, गारगोटी मार्गावर वाहतुकीचा ताण वाढला होता.