कोल्हापूर : पर्यटनासह धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी गेलेले कोल्हापूरसह सांगली, सोलापूर व पुण्यातील ४० पर्यटक इराणमध्ये सुरक्षित आहेत. मंगळवार दिनांक ३ते परतणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पर्यटकांशी संपर्क साधून दिलासा दिला आहे. कोरोना विषाणूमुळे विमानसेवा रद्द केल्याच्या चर्चेने पर्यटकांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी आपण सुरक्षित आहोत, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे.
कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील मुस्लीम भाविक व पर्यटक वर्षातून दोनवेळा इराण, इराक येथील धार्मिकस्थळे व पर्यटनस्थळे पाहण्यासाठी जात असतात. त्याप्रमाणे यंदाही एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून आयोजक व गाईड मुन्ना पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटक इराण, इराक दौºयावर पर्यटनासाठी गेले आहेत. हे सर्व पर्यटक मुंबईहून विमानाने तेहरान (इराण) येथे पोहोचले. त्यानंतर इराणमधील धार्मिकस्थळे व पर्यटनस्थळे पाहून झाल्यानंतर इराकमधील धार्मिक व स्थळे पाहण्याचे नियोजन होेते. परंतु इराक सरकारने विमान वाहतुकीसाठी आपल्या सीमा बंद केल्याने हे सर्व पर्यटक इराणमध्येच अडकले.
पुढे जाण्याचा मार्ग बंद झाल्याने इराणमधील बुस्तान, सीमनान, खरगण, निशाबोर, तेहरान या शहरांतील धार्मिकस्थळांना पर्यटक भेटी देत आहेत. नियोजनाप्रमाणे ३ मार्चला हे पर्यटक पुन्हा विमानाने भारतात येणार आहेत. तोपर्यंत पर्यटकांना इराणमधील धार्मिकस्थळे दाखविली जात असून, त्यांच्या राहण्या-खाण्याची अत्यंत चांगल्याप्रकारे सुविधा केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कोरोना विषाणूमुळे विमानसेवा बंद झाल्याने पर्यटक इराकमध्ये अडकले आहेत, अशी चर्चा भारतात त्यांच्या कुटुंबियांच्या कानावर आली आहे. त्यामुळे कुटुंबियांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यांच्याकडून संबंधितांना फोन करून ख्यालीखुशाली विचारली जात आहे. सहलीला गेलेले बहुतांश पर्यटक हे ज्येष्ठ नागरिक आहेत. घरातून वारंवार फोन येत असल्याने त्यांच्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
इराणमधील भारतीय वकिलातीशी संपर्क
भारताकडे जाणाऱ्या दोन विमानसेवा रद्द झाल्याने आयोजक मुन्ना पठाण यांनी इराणमधील भारतीय वकिलातीमध्ये जाऊन ३ मार्चची विमानसेवा रद्द होऊ नये, यासाठी भारत सरकारला कळवावे, अशी विनंती केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याशीही संपर्क साधण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलासा
कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटक इराणमध्ये अडकल्याचे समजल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तात्काळ टूर्सचे संयोजक मुन्ना पठाण यांच्यासह पर्यटकांशी संपर्क साधला. काही अडचण असल्यास कळवावे, अशा शब्दांत दिलासा दिला. दररोज पर्यटकांशी जिल्हाधिकाऱ्यांकडून संवाद सुरू असल्याचे सांगण्यात आले.सर्व पर्यटक इराणमध्ये सुरक्षित आहेत. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे मंगळवारी आम्ही सर्वजण भारतात परतणार आहोत. बहुतांश पर्यटक हे ज्येष्ठ असल्याने त्यांची औषधे केव्हाही संपू शकतात. त्यामुळे इराणमधून भारतात येणारे विमान हे रद्द न होता ते ठरलेल्या वेळेप्रमाणे येईल, या दृष्टीने प्रशासन व सरकारच्या पातळीवर प्रयत्न व्हावेत.-मुन्ना पठाण, आयोजक, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स