कोल्हापूर : सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या विविध व्यक्ती व संस्थांनी एकत्र येऊन ‘केवायफोरएच’ या शिखर संस्थेच्यावतीने गुरुवारी नागरिकांना वाहतुकींचे नियमांसंबंधी प्रबोधन उपक्रमास प्रारंभ केला. या उपक्रमाचे उद्घाटन हॉकी स्टेडियम येथे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले.गुरुवारी पहिल्या दिवशी हॉकी स्टेडियम, गोखले कॉलेज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, उमा टॉकीज व फोर्ड कॉर्नर येथील चौकात संस्थेच्या सदस्यांनी वाहतुकींच्या नियमांचे फलक हातांमध्ये घेऊन प्रबोधन केले. यावेळी ‘सिग्नलवर रस्त्यांची डावी बाजू मोकळी सोडा’, ‘अॅम्ब्युलन्सला रस्ता द्या’ असे फलक हातांमध्ये घेतले होते. सकाळी ९ ते ११ अशा दोन सदस्यांनी प्रबोधन केले. याला नागरिकांनी व वाहनधारकांनी चांगला प्रतिसाद दिला.काही वाहनधारकांनी आपल्या चुका मान्य करून दिलगिरी व्यक्त करत वाहतुकीचे नियम पाळण्याची ग्वाही दिली. हा उपक्रम शनिवार(दि. १९)पर्यंत रोज सकाळी व सायंकाळी दोन सत्रांत विविध चौकांत राबविला जाणार आहे. या उपक्रमात सार्थक क्रिएशन्स, गनिमी कावा, मराठा साम्राज्य, हिल रायडर्स, उडाण फौंडेशन यांच्यासह विविध संस्था व व्यक्तींनी सहभाग घेतला होता.