कोल्हापूर : शिवाजी पुलावरील मिनी बस दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी पोलीस मुख्यालयातील मोटार वाहन विभागाच्या पिछाडीस असलेल्या महादेव मंदिर कॉर्नरला मिनी बसचे थरारक प्रात्यक्षिक मंगळवारी घेतले. बसची वेगमर्यादा व उजवीकडे घेतलेला वळसा हे दोन्ही निष्कर्ष काढण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे दहा फेऱ्या घेण्यात आल्या.
प्रात्यक्षिकांमधून बऱ्यांपैकी अंदाज आला आहे; परंतु चालकाच्या चुकीमुळे की बसमधील तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना घडली हे चार दिवसांत स्पष्ट होईल, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.
दुर्घटना घडून पाच दिवस झाले तरीही नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. बसने अचानक वळसा कसा घेतला? यांत्रिक बिघाड की चालकाची चूक या दोन्ही बाजू तपासण्यासाठी पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस मुख्यालयातील मोटार वाहन विभागाच्या पिछाडीस प्रतीकात्मक मिनी बसचे प्रात्यक्षिक घेतले.प्रात्यक्षिकासाठी नवीन पोलीस व्हॅनचा (एम. पी. ११ आय. आर. ए. बी. ९०६३) वापर करण्यात आला. मोटार वाहन विभागाकडे पोलीस नाईक म्हणून रूजू असलेले तज्ज्ञ चालक सचिन ढोबळे यांनी चालकाची भूमिका बजावली. शंभर फुटांवरून ही व्हॅन दहावेळा ‘यू टर्न’ घेऊन फिरविण्यात आली. त्यामध्ये ३० ते २० वेगमर्यादेमध्ये उजवीकडे वळसा घेताना बस किती झुकते याचा अंदाज घेतला.
प्रत्येकवेळी चॉकपिटद्वारे रेषा ओढून निष्कर्ष काढला गेला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत साळी, ए. के. पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर, उपनिरीक्षक युवराज आठरे यांच्यासह कर्मचारी प्रात्यक्षिक घेताना बसच्या वेगावर व वळसा घेताना अंतरावर लक्ष ठेवून होते.
प्रात्यक्षिकामध्ये अपघाग्रस्त मिनीबसचा वेग ३० ते २० असल्याचा अंदाज वर्तविला आहे. चालकाची चूक की बसमधील तांत्रिक बिघाड हे चार दिवसांत प्रात्यक्षिकांवरून पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाकडील मॅकेनिकल इंजिनिअर अभ्यास करून निष्कर्ष काढणार आहेत.
शिवाजी पुलावर मिनी बसने अचानक वळसा घेतला आहे. त्याचे कारण शोधण्यासाठी प्रात्यक्षिक घेतले आहे. लवकरच यावतून अपघाताचे कारण स्पष्ट होईल.डॉ. एस. टी. अल्वारिस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
बस अपघात तांत्रिक बिघाडामुळे की चालकाच्या मानसिकतेमुळे हे शोधण्यासाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले. ३० ते २० वेगात बसने वळसा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी तज्ज्ञ मॅकेनिकल इंजिनिअरांची मदत घेतली जात आहे.दिनकर मोहिते,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
अपघातग्रस्त मिनी बस ही पॉवर स्टेअरिंगची आहे. चालकाच्या किंचिंत डोळ्यांवर झापड आल्यानंतर हा अपघात झाल्याची शक्यता आहे.सचिन ढोबळे,तज्ज्ञ चालक, मोटार वाहन विभाग