कोल्हापूर/हेरले : कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर चोकाक येथे (ता हातकणंगले) कंटेनर व स्कूल बसची धडक होवून कंटेनर चालक व वाहक दोघेजण जागीच ठार झाले. तर स्कूल बस मधील १६ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. प्राथमिक माहितीनुसार मृतामध्ये सुरेश खोत ( रा. कवठेमहाकाळ), आणि सचिन खिलारी (रा.शेणवडे ता. माण, जि. सातारा) यांचा समावेश आहे, अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
घटनास्थळावरून आणि पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने कंटेनर येत होता. याच वेळी संजय घोडावत स्कूलची बस गांधीनगरहुन मुलांना घेऊन अतिग्रेच्या दिशेने चालली होती.
यावेळी सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने येणारा कंटेनर डिव्हाडर फोडून विरुद्ध दिशेला घुसल्याने अतिग्रेच्या दिशेने जाणारी स्कूल बसची आणि कंटेनरची धडक झाली. या अपघातात कंटेनर चालक व वाहक दोघेजण जागीच ठार झाले, तर स्कूल बस मधील १६ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन तास वाहतूक कोंडीकंटेनर आणि स्कूल बसचा अपघात सकाळी साडे आठच्या सुमारास घडला. या अपघातानंतर कोल्हापूर सांगली राज्यमार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती. सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. हातकणंगले पोलीस ठाण्याचे कर्मचारी आल्यावर वाहतूक सुरळीत झाली.
स्थानिक लोकांचे मदत कार्यस्कूल बसचा अपघात झाल्याचे समजताच चोकाक, माले , हेरले येथील स्थानिक लोकांनी बस मधून विद्यार्थांना बाहेर काढण्याचे मदत कार्य नंदकुमार पाटील, सचिन कुंभार, बापूसो पाटील, अजित पाटील तसेच घटनास्थळाला , हातकणंगले माजी सभापती राजेश पाटील, माजी सरपंच बालेचॉद जमादार, तात्काळ आले होते.
चालकाच्या प्रसंगावधानाने मुले वाचलीस्कूल बसचा चालक जयसींग चौगुले (मुरगुड) यांच्या प्रसंगावधानाने मुले वाचली. स्कूल बस अतिग्रेच्या दिशेने जात असताना चोकाक फाटा येथे डिव्हायडर तोडून कंटेनर उलट्या दिशेने आला, हे बस चालक जयसींग चौगुले याच्या लक्षात आल्यावर त्यांनी बस शेजारच्या शेतात घातली. चौगुले यांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठा अपघात झाला असता. यामध्ये चौगुले गंभीर जखमी झाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जखमीची विचारपुस केली.
साडे आठच्या सुमारास अपघात संजय घोडावत स्कूलच्या बसमध्ये २५ विद्यार्थी होते. ही बस चिंचवाड, वळीवडे, गांधीनगर, तावडे हॉटेल मार्गावरील पंचवीस विद्यार्थी घेऊन सकाळी आठ वाजता बाहेर पडली होती. ही बस अतिग्रेच्या दिशेने जात असताना साडे आठच्या सुमारास हा अपघात घडला.