कोल्हापूर : ‘कपड्यांचे पैसे मागितल्यास ठार मारीन,’ अशी धमकी देऊन चार हजार ८०० रुपयांचे कपडे जबरदस्तीने नेल्याप्रकरणी मंगळवार पेठ, नंगीवली चौकातील दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.स्वप्निल जगन्नाथ साळोखे (वय २६, रा. बाळासाहेब पाटील यांच्या भाड्याच्या घरी, नंगीवली चौक) व अभिजित माणिकराव कुदळे (२५, रा. पाण्याच्या खजिन्याजवळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून कापड दुकानातून घेतलेले कपडे पोलिसांनी जप्त केले.पोलिसांनी सांगितले की, गंगावेश, धोत्री गल्ली येथील संकेत शिवाजी कोळी (वय २१, रा. २०४९, ए वॉर्ड) हे मिरजकर तिकटीजवळील ‘जॉनी पॅशन वर्ल्ड’ या कापड दुकानात कामास आहेत. राजेंद्र गवळी -भोसले यांच्या मालकीचे हे दुकान आहे.
अभिजित कुदळे (आरोपी )
मालक दुकानात नसताना रविवारी (दि. २६) संशयित स्वप्निल साळोखे व अभिजित कुदळे हे दोघे आले. त्यांनी संकेत कोळी यांना ‘आपण दुकानमालकांचे मित्र आहोत आणि आपणास पॅँट, शर्ट घ्यावयाचे आहेत,’ असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी या दोघांना कपडे दाखविले. त्या दोघांनी तीन जिन्स पॅँट, दोन फुल शर्ट व एक हाफ टी-शर्ट असे पसंत केले. याचे ४८०० बिल झाल्याचे त्यांनी सांगितले.हे ऐकून साळोखे याने कोळी यांना शिवीगाळ करून ‘आमच्याकडे पैसे मागतोस काय?, आम्ही कोण आहे माहीत नाही का तुला?’ असे म्हणून कोळी यांची कॉलर पकडून त्यांना बाजूला ढकलून दिले. त्यावेळी संशयित कुदळेने कोळी यांना ठार मारण्याची धमकी देऊन काउंटरवर ठेवलेली कपड्यांची पिशवी जबरदस्तीने घेऊन ते दोघे तेथून गेले. हा प्रकार दुकानमालकांना सांगितल्यानंतर संकेत कोळी यांनी फिर्याद दिली.दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. संशयित आरोपी हे नंगीवली चौकात सापडले. त्यावेळी दुचाकीच्या डिकीमध्ये दुकानातून नेलेले कपडे आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले.ही कारवाई पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण, पोलीस नाईक एकनाथ चौगले, प्रीतम मिठारी, सचिन देसाई, गजानन परीट, प्रदीप पाटील, संदीप बेंद्रे, नितीन कुराडे, शाहू तळेकर यांनी केली.