कोल्हापूर : येथील अंबाबाई मंदिर आणि भवानी मंडप परिसरात भाविकांचे मोबाईल आणि दागिने चोरणाऱ्या कर्नाटकातील दोन सराईत महिला चोरट्यांना भाविकांनी रंगेहात पकडून राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित रूपा रामु बजंत्री (वय २२), रक्षा मनोज गायकवाड (२५, दोघी. रा. हुबळी-कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल जप्त केला.अधिक माहिती अशी, अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत अनेकवेळा भाविकांची पाकिटे, पर्स, मोबाईल चोरीला गेले आहेत. संतोष इराप्पा बेळगावे (वय ३३, रा. सांगलीवाडी, जि. सांगली) हे कुटुंबासह अंबाबाई दर्शनासाठी आले होते. भवानी मंडप परिसरात त्यांच्या खिशातील मोबाईल चोरीला गेला. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही फुटेजवरून शोध घेतला असता, दोन महिला मोबाईल चोरताना दिसून आल्या. सीसीटीव्ही सुरक्षा नियंत्रक राहुल जगताप व सुरक्षा अधिकारी संदीप साळोखे यांनी शिताफीने त्यांना भवानी मंडप परिसरात फिरत असताना पकडून राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
या महिलांनी वेळोवेळी गर्दीचा फायदा घेत चोऱ्या केल्याचे पुढे आले आहे. त्यांची टोळी असून आणखी काही साथीदारांचा समावेश आहे. राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मानसिंग खोचे अधिक तपास करीत आहेत.