शिरोली : कासारवाडी घाटात मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन्ही मोटारसायकल स्वार जागीच ठार झाले आहेत. यात दिव्यांग जिल्हाध्यक्ष नारायण तुकाराम मडके वय.४०, रा. मादळे,ता.करवीर), अनिल बाबुराव वरुटे (वय.४२,रा. कासारवाडी, ता. हातकणंगले) यांचा समावेश आहे. हा अपघात सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास कासारवाडी कुरुण शिवारात घडला.
अधिक माहिती अशी अनिल वरुटे हे सादळे येथील फार्म हाऊसवर कामाला आहेत. तिथेच त्यांचा रसवंतीचा व्यवसाय आहे. ते व्यवसायानिमित्त परिवारासह सादळे येथे राहतात. मुलगी कासारवाडी हायस्कूल मध्ये शिक्षण घेते सोमवारी रात्री सातच्या सुमारास सादळे येथून मुलगीला कासारवाडीतून आणण्यासाठी ते जात होते. याच वेळी टोपहून सादळे मादळेला नारायण मडके हे आपल्या हॅंडीकॅप दुचाकीवरून घरी जात होते. कासारवाडी घाटात दोन्ही मोटारसायकलींची जोरात धडक होऊन अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोघांच्याही डोक्याला मार लागला.
अपघात झाल्याचे समजताच कासारवाडी आणि सादळे मादळे येथील सरपंच अच्युत खोत, पंडित बिडकर आणि स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दोघांना तात्काळ उपचारासाठी कोल्हापूर मधील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सीपीआर मध्ये दोन्ही गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे कासारवाडी आणि सादळे मादळे गावात शोककळा पसरली होती. दोघांच्या वर रात्री उशिरा अत्यंत संस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील करत आहेत.
दोघांची ही परिस्थिती बेताचीच कासारवाडी अपघातात ठार झालेल्या अनिल वरुटे यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, मुलगी आणि आई वडील असून ते दुसऱ्यांच्या फार्म हाऊसवर कामाला होते. तर नारायण मडके हे दिव्यांग असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.